*दिल्लीला छावणी चे स्वरूप: जंतर मंतरवरील पोलीस कारवाईवर राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाची टीका*
*पहलगाम, पुलवामा आणि उरी येथे अशी सुरक्षा असती तर हल्ले टळले असते : राष्ट्रवादी (शप) नेते महेश तपासे*
मुंबई, १० ऑक्टोबर : निवडणूक प्रक्रियेबद्दल उत्तरे मागणाऱ्या तरुणांना केंद्र सरकार पोलिसी बाळाचा वापर करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते महेश तपासे यांनी केला.
प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात तपासे यांनी दिल्लीचे वर्णन स्वतःच्याच तरुणाईविरुद्ध उभारलेली “छावणी” असे केले. दिल्ली पोलिसांच्या मदतीसाठी केंद्रीय निमलष्करी दलांचे सुमारे २३,००० जवान उपलब्ध करून देण्यात आले असून, याशिवाय दिल्ली पोलिसांचे आणखी सुमारे २०,००० कर्मचारी मैदानात तैनात असल्याचे वृत्त आहे, असे ते म्हणाले.
“निःशस्त्र विद्यार्थ्यांच्या जमावाकडे आता सीमेवरील उत्पन्न झालेल्या धोक्यासारखे पाहिले जात आहे,” असा गंभीर आरोप तपासे यांनी मोदी सरकारवर केला.
मोदी सरकार सीमांवर इतकेच सतर्क असते, तर पहलगाम, पुलवामा आणि उरी येथे आतंकवादी हल्ले झाले नसते असा टोला तपासे यांनी लगावला.
देशावर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध नव्हे, तर निःशस्त्र तरुण आंदोलकांविरुद्ध सरकार आपली ताकद वापरत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
तपासे पुढे म्हणाले “हे विद्यार्थी कोणत्याही राजकीय पक्षाचे नाहीत. त्यांच्या हातात संविधान आहे आणि त्यांच्या आवाजात देशाची अंतरात्मा आहे.”
राष्ट्रवादी (शप), इतर विरोधी पक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणावर (SIR) पक्षाने आक्षेप घेतला असून, इतर दोन निवडणूक आयुक्तांनी असहमती दर्शवूनही कुमार यांनी त्यांना बाजूला सारल्याचा आरोपही केला आहे.
शांततापूर्ण तरुणांच्या आंदोलनाची सरकारला भीती का वाटते, आंदोलकांना ताब्यात का घेतले जात आहे आणि त्यांच्याविरुद्ध बळाचा वापर का होत आहे, असे प्रश्न तपासे यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना विचारले. मतदार वगळण्याबद्दलच्या चिंतांना आणि मतदार याद्यांच्या विश्वासार्हतेवरील शंकांना सरकार उत्तर का देत नाही, आणि ज्ञानेश कुमार यांना “पाठीशी” का घालत आहे, असेही त्यांनी विचारले.
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची तसेच SIR प्रक्रियेची आणि निवडणूक आयोगावरील आरोपांची स्वतंत्र चौकशी मागणी करत ताब्यात घेतलेल्या सर्व आंदोलकांची व सीजेपी नेत्यांची तातडीने सुटका करावी, अशी मागणीही तपासे यांनी केली.























