महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळील केशवराव खाड्ये मार्गावर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने केबल आधारित उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. विकास नियोजन आराखड्यानुसार सुरू असलेल्या या उड्डाणपुलाच्या कामाची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प)अभिजीत बांगर यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली व विविध निर्देश दिले.
केशवराव खाड्ये मार्गावर उभारण्यात येणारा ‘केबल स्टेड पूल’ हा रेल्वे रूळांवरील महानगरपालिकेचा पहिला केबल आधारित पूल आहे. महालक्ष्मी रेल्वे स्थानकानजीक पश्चिम रेल्वेवरून सात रस्ता ते महालक्ष्मी मैदान यांना हा पूल जोडतो. या पुलाची लांबी ८०३ मीटर तर रुंदी १७.२ मीटर आहे. रेल्वे हद्दीतील रुंदी २३.०१ मीटर इतकी आहे.
या उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर असून केबल – स्टेड पुलास आधार देण्यासाठी ७८.५ मीटर उंचीचा पायलॉन (भव्य लोखंडी खांब) उभारण्यात आला आहे. पायलॉनच्या पश्चिमेकडील ९५ मीटर लांबीच्या स्पॅनचे काम पूर्ण झाले आहे. पूर्वेकडील १६५ मीटर लांबीच्या स्पॅनची उभारणी रेल्वे हद्दीतील जागेत रेल्वे विभागाकडून आवश्यक खंड (Block) प्राप्त झाल्यानंतर करण्यात येणार आहे.
पायलॉनच्या पश्चिम दिशेकडील बहुतांश खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे. तथापि, वाहतूक वळविण्याच्या (Traffic Diversion) कामामुळे पाच खांबांची उभारणी अद्याप प्रलंबित आहे. वाहतूक पोलिसांच्या (Traffic Police) परवानगीनंतर वाहतूक वळविण्यात येईल. या कामी महानगरपालिकेच्यावतीने काँक्रीटचा सेवा रस्ता (Service Road) बांधण्यात येत आहे. विविध उपयोगिता वाहिन्या टाकण्याची कामेही सुरू आहेत.
वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने या सेवा रस्त्यावर वाहतुकीचे अवागमन केले जाईल. एकूणच, उड्डाणपुलाचे कामकाज दिनांक ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे पूल विभागाचे उद्दिष्ट्य आहे.
प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे यांसह संबंधित अभियंते उपस्थित होते.
























