Home मुंबई *​”उच्च शिक्षणाचा गळा घोटणारे ‘खोके सरकार’; विद्यापीठ भरतीच्या नावाने पुन्हा एकदा तरुणांच्या...

*​”उच्च शिक्षणाचा गळा घोटणारे ‘खोके सरकार’; विद्यापीठ भरतीच्या नावाने पुन्हा एकदा तरुणांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार!”* ​— ॲड. अमोल मातेले (प्रदेश प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार)

22
0

​मुंबई: रविवार दिनांक 26 जुलै 2026, उच्च शिक्षणाला नवी गती देण्याच्या आणि विद्यापीठांचे रँकिंग सुधारण्याच्या पोकळ बाता मारणाऱ्या मिंधे सरकारने पुन्हा एकदा ६५९ पदांच्या भरतीचे गाजर दाखवून महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची क्रूर थट्टा केली आहे. सन २०२२ मध्ये आमदार फोडून आणि पळवून नेऊन सत्तेवर बसल्यापासून हे सरकार दर काही महिन्यांनी भरतीची घोषणा करत आहे, मात्र प्रत्यक्षात हाताला काम देण्याऐवजी केवळ ‘तारखांवर तारखा’ देण्याचे काम सुरू आहे, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे प्रदेश प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांनी केला आहे.

​या संदर्भात भाष्य करताना ॲड. अमोल मातेले यांनी सरकारवर उपरोधिक टोला लगावत खालील प्रमुख मुद्दे मांडले
​२०२२ पासून केवळ कागदी भरतीचा खेळ: आमदार पळवून सत्ता मिळवल्यापासून हे सरकार शिक्षणाचा दर्जा आणि भरती प्रक्रिया सुधारण्याच्या गप्पा मारत आहे. २०२२ पासून आजपर्यंत केवळ घोषणांचा पाऊस पाडला, पण प्रत्यक्ष एकही कायमस्वरूपी भरती पूर्ण झालेली नाही.

​६५९ पदांसाठी २०२६ ची मुदत म्हणजे निव्वळ वेळकाढूपणा:
अवघ्या ६५९ प्राध्यापक, सहाय्यक/सहयोगी प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी थेट डिसेंबर २०२६ पर्यंतची मुदत मागणे हा या सरकारचा निरुत्साह आणि वेळकाढूपणा स्पष्ट करतो. आमदार पळवायला आणि सरकार पाडायला ज्या सरकारला २४ तास पुरतात, त्यांना ६०० पदे भरायला चार वर्षे लागतात का?
​कायमस्वरूपी शिक्षक नसताना रँकिंग कसे सुधारणार?
विद्यापीठे आणि अनुदानित महाविद्यालये आज तासिकारूपाने (CHB) काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या भरवशावर चालू आहेत. ज्या ठिकाणी उच्च शिक्षण देणाऱ्या शिक्षकांचे आर्थिक व मानसिक शोषण होते, तिथे पोर्टलवर केवळ जमा-खर्चाची माहिती टाकून विद्यापीठांचे आंतरराष्ट्रीय रँकिंग सुधारणार का?

​पोर्टलचा फुसका देखावा:
१,२०० हून अधिक अनुदानित महाविद्यालयांची आर्थिक माहिती पोर्टलवर उपलब्ध करून पारदर्शकतेचा आव आणणारे सरकार, वर्षानुवर्षे रिक्त असलेल्या हजारो पदांची खरी माहिती जनतेसमोर मांडण्याचे धाडस का दाखवत नाही?

​NET/SET आणि Ph.D. धारकांची फसवणूक:
राज्यातील हजारो NET, SET आणि Ph.D. पदवीधारक तरुण आज वयोमर्यादा संपण्याच्या मार्गावर आहेत. कायमस्वरूपी नोकरीच्या आशेने दिवस ढकलणाऱ्या या तरुण पिढीचे आयुष्य या सरकारच्या धोरणांमुळे उद्ध्वस्त होत आहे.
​”आमदार पळवून सरकार स्थापन करायला यांच्याकडे अफाट गती आणि यंत्रणा असते, पण महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार द्यायचा आला की या ‘बुलेट ट्रेन’ सरकारची गती बैलगाडीपेक्षाही मंद होते. पोर्टल्स आणि घोषणांचे खेळ बंद करा आणि त्वरित कायमस्वरूपी भरती करून दाखवा!”

— ॲड. अमोल मातेले
प्रदेश प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here