मानखुर्द येथे कंत्राटी बेस्ट बसगाडीचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, चालक व वाहक जखमी*
*मुंबई, दि. २० जुलै :* सायन–पनवेल महामार्गावरील मानखुर्द येथे विश्वकर्मा रुग्णालयासमोर आज सकाळी बेस्टच्या बसमार्ग क्रमांक ५०१ वरील बसचा भीषण अपघात झाला. ही बस रस्त्यालगतच्या दुभाजकावर धडकली. अपघातात रस्त्याच्या दुभाजकाजवळ उभ्या असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला असून बसचा चालक व वाहक जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बसगाडी प्रतीक्षा नगर आगारातील मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट या कंत्राटदाराची होती. आज सकाळी सुमारे ९.१४ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
या अपघातात भास्कर रावसाहेब पांडे (वय ६५) हे दुभाजकाजवळ उभे असताना बसच्या धडकेत गंभीर जखमी झाले. त्यांना राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
अपघातात बसचे वाहक वैभव वाघमारे (वय ४१) आणि चालक बनवारी श्रीराम प्रसाद शर्मा (वय ५१) हे देखील जखमी झाले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.
*आपली बेस्ट आपल्याचसाठी*
ई-मेल : aaplibest@gmail.com



















