*महाराष्ट्र सागरी मंडळ आणि मे.झोया मरीन सर्व्हिसेस प्रा.लि.यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण सामंजस्य करार!*
*मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात सागरी विकासाला नवी गती – मंत्री नितेश राणे*
*मुंबई, दि. ९ :* राज्यातील सागरी वाहतूक अधिक आधुनिक, पर्यावरणपूरक आणि आत्मनिर्भर करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी जलयाने (वॉटर मेट्रो व्हेसल्स) उपलब्ध करून देणे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात जहाजबांधणी सुविधा विकसित करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि मे. झोया मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्यात आज मंत्रालयात सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा करार झाला.
यावेळी मंत्री नितेश नितेश राणे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सागरी क्षेत्रात मोठी गुंतवणूक आकर्षित करण्यावर भर दिला जात आहे. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी अत्याधुनिक जलयाने उपलब्ध करून देण्याबरोबरच सिंधुदुर्गमध्ये इलेक्ट्रिक बोट निर्मितीचा उद्योग उभारल्यामुळे राज्याच्या सागरी अर्थव्यवस्थेला नवे बळ मिळेल. यामुळे स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील, आधुनिक जहाजबांधणीला चालना मिळेल.
या सामंजस्य करारानुसार मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक असलेली आधुनिक व पर्यावरणपूरक जलयाने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील तालवणे येथे सुमारे २२ एकर जागेवर सुमारे १५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत इलेक्ट्रिक बोट निर्मितीचा अत्याधुनिक कारखाना उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात हरित सागरी वाहतुकीला चालना मिळण्यासोबतच जहाजबांधणी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढणार आहे.
या बैठकीत दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा आराखडा, गुंतवणूक, तांत्रिक सहकार्य, स्थानिक कौशल्य विकास, रोजगारनिर्मिती तसेच भविष्यातील सागरी उद्योगवृद्धीच्या विविध पैलूंवर सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यातील सागरी पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावणे, किनारपट्टी भागात औद्योगिक विकासाला चालना देणे आणि पर्यावरणपूरक जलवाहतूक व्यवस्था विकसित करणे, या दृष्टीने हा सामंजस्य करार महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
बैठकीस परिवहन व बंदरे विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी,महाराष्ट्र सागरी मंडळाचे वरिष्ठ अधिकारी, मे. झोया मरीन सर्व्हिसेस प्रा. लि.चे संचालक जॉन फर्नांडिस, संचालक सुरज देवाढीया तसेच अंबर आयंदे, डॉ. निलेश बानवलीकर उपस्थित होते.
000000



















