*सध्याचे हवामान आणि ताशी ७० ते ८० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व विकासक, वास्तुविशारद, परवानाधारक सर्वेक्षक (LS), कंत्राटदार, प्रकल्प व्यवस्थापक आणि बांधकाम स्थळांशी संबंधित अभियंते यांना खालील सुरक्षाविषयक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत.*
१) बांधकामासाठी उभारलेले तात्पुरते मचान / परांची (स्कॅफोल्डिंग), सुटे व खुले साहित्य, क्रेनवरील साहित्य, संरक्षण भिंतींसह (कंपाऊंड वॉल्स) बांधकाम स्थळी असणारे पत्रे, साचाबांधणी (फॉर्मवर्क) तसेच सर्व तात्पुरत्या संरचनांची सखोल तपासणी करून त्या स्थिर, सुरक्षित आणि भक्कम स्थितीत असल्याची खात्री करावी.
इमारतीच्या वरच्या मजल्यांवर, गच्चीवर (टेरेस) आणि उंचावरील प्लॅटफॉर्मवर असलेले सुटे व खुले साहित्य त्वरित हटवावे किंवा योग्यप्रकारे बांधून सुरक्षित करावे.
२) कोणत्याही बांधकाम स्थळी अव्यवस्थित किंवा निष्काळजीपणे कामकाज होऊ देऊ नये. सर्व कामाचे नियोजन, देखरेख आणि अंमलबजावणी सुरक्षितरित्या व पद्धतशीरपणे करावी.
खोदकाम करण्यात आलेल्या बांधकाम स्थळांवर योग्य सुरक्षा उपाययोजना कराव्यात आणि त्यावर काटेकोरपणे देखरेख ठेवावी.
३) टॉवर क्रेन, मटेरियल होईस्ट, बांधकाम लिफ्ट, सुरक्षा जाळ्या (सेफ्टी नेट्स) आणि उचलण्याची उपकरणे (लिफ्टिंग इक्विपमेंट) यांची स्थिरतेच्या दृष्टीने तपासणी करावी.
हवामानामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यास उचलण्याची कामे (लिफ्टिंग ऑपरेशन्स) आणि उंचावरची सर्व कामे तात्काळ थांबवावीत. तसेच, बांधकाम सुरू असलेल्या परिसरात प्रतिबंधित सुरक्षा क्षेत्र (Exclusion Zone) कायम ठेवावे.
४) सर्व कामगारांनी निर्धारित वैयक्तिक सुरक्षा साधनांचा (PPE) तसेच उंचावर काम करताना आवश्यक ‘फॉल प्रोटेक्शन’चा वापर करणे बंधनकारक आहे.
संपूर्ण बांधकाम स्थळाची तात्काळ सुरक्षा तपासणी करून सर्व असुरक्षित बाबी विलंब न करता दुरुस्त कराव्यात.
५) हवामान परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवावे आणि परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
*सर्व संबंधितांनी या सुरक्षाविषयक सूचनांकडे अत्यंत तातडीची बाब म्हणून पाहावे. सुरक्षा नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.*
*कामगार, परिसरातील रहिवासी आणि सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे. सर्व विकासकांनी या सुरक्षाविषयक मार्गदर्शक सूचनांची अत्यंत गांभीर्याने दखल घेऊन लागू असलेल्या सर्व सुरक्षाविषयक नियमांचे आणि उत्कृष्ट बांधकाम पद्धतींचे काटेकोरपणे पालन करावे.*
*– बृहन्मुंबई महानगरपालिका*
















