*प्रश्नोत्तराच्या तासावेळी भाजपा गटनेते आ. प्रवीण दरेकरांची विचारणा*
मुंबई – विधान परिषद सभागृहात आज सदस्य सुधाकर अडबाले यांनी पेसा कायद्याअंतर्गत शिक्षकांच्या पदांचा प्रश्न उपस्थित केला. यावेळी भाजपा गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी पेसा कायद्याअंतर्गत होणाऱ्या भरती प्रक्रियेत आदिवासी समाजात उमेदवार शोधण्यासाठी शासनाकडे स्वतंत्र यंत्रणा आहे का?, अशी विचारणा केली.
प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान बोलताना आमदार दरेकर म्हणाले की, पेसा हा आदिवासींच्या हिताकरिता महत्त्वाचा असा कायदा आहे. या कायद्याअंतर्गत भरती व्हावी, आदिवासी समाजाचे उमेदवार असावेत अशी अपेक्षा असते. एका बाजूला आपल्याकडे आदिवासी नाही म्हणून मानधनावर शिक्षक घेतो. जर मानधनावरील लोकं नियमित करतो तर कंत्राटीही सक्षम असतील तर त्यांनाही नियमित करण्यासंदर्भात भूमिका घेणे गरजेचे आहे. पेसा कायद्या अंतर्गत होणाऱ्या भरती प्रक्रियेत आदिवासी समाजातील उमेदवार शोधण्यासाठी शासनाची स्वतंत्र यंत्रणा आहे का? जर ही यंत्रणा नसेल तर एक विशेष मोहीम राबवून राज्यभरातून अशा प्रकारचे उमेदवार मिळवण्यासाठी शासन ठोस उपाययोजना करणार का? अशी विचारणाही दरेकरांनी केली.
यावर बोलताना राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी जास्तीत जास्त आदिवासींना शासकीय नोकऱ्यांमध्ये संधी देण्यासाठी उपाययोजना करून व आदिवासी प्रवर्गातील उमेदवारांना संधी देऊ, असे आश्वासित केले.
00000


















