Home मुंबई *अति‍रिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी घेतला हॉस्पिटल मॅनेजमेंट...

*अति‍रिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी घेतला हॉस्पिटल मॅनेजमेंट ऍण्‍ड इन्फॉर्मेशन सिस्टीम (एचएमआयएस) कार्यप्रणालीचा आढावा*

6
0

*के.ई.एम. रूग्‍णालयात एमआरआय मशीन जलद गतीने कार्यान्वित करावी*

*पेट स्‍कॅन मशीनचे आधुनिकरण करण्‍याचे निर्देश*

रुग्णांना दर्जेदार, तातडीच्या व परिणामकारक आरोग्यसेवा अखंडपणे उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालयातील सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने कार्य करावे. तसेच नागरिकांना अधिक कार्यक्षम, सुलभ आणि वेळेत वैद्यकीय सेवा मिळतील यासाठी आवश्यक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी दिले.

अति‍रिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी आज (दिनांक १८ जून २०२६) सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्‍मारक रूग्‍णालय (के. ई. एम.) येथे वैद्यकीय सेवा सुविधांचा आढावा घेतला. उपायुक्‍त (सार्वजनिक आरोग्‍य) शरद उघडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रूग्‍णालये) डॉ. शैलेश मोहिते, प्रभारी अधिष्‍ठाता डॉ. अमिता आठवले, कार्यकारी आरोग्‍य अधिकारी डॉ. दक्षा शहा या बैठकीस उपस्थित होते.

अति‍रिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी सुरूवातीला रुग्णालयातील हॉस्पिटल मॅनेजमेंट ऍण्‍ड इन्फॉर्मेशन सिस्टीम (एचएमआयएस) कार्यप्रणालीचा सविस्तर आढावा घेतला. यामध्ये रुग्ण नोंदणी, वैद्यकीय अभिलेखांचे डिजिटल व्यवस्थापन, तपासणी अहवाल, औषध वितरण, दाखल रुग्णांची माहिती तसेच विविध विभागांमधील माहितीची देवाणघेवाण या बाबींची माहिती घेण्यात आली. रुग्णांना अधिक जलद, अचूक आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी एचएमआयएस प्रणालीचा प्रभावी वापर होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच प्रणालीच्या अंमलबजावणीत डॉक्‍टर, कर्मचारी वृंद यांना येणाऱ्या अडचणी, तांत्रिक बाबी आणि सेवा वितरणातील परिणामकारकता यांचाही आढावा घेऊन, रुग्णालयातील सर्व विभागांनी या डिजिटल प्रणालीचा समन्वयाने व अधिक कार्यक्षमतेने वापर करण्याचे निर्देश दिले. यामुळे रुग्णसेवा अधिक सुलभ, गतिमान आणि नागरिकाभिमुख होण्यास मदत होईल, असा विश्वास डॉ. शर्मा यांनी व्यक्त केला.

बैठकीदरम्यान प्रणालीद्वारे रुग्ण नोंदणी, ऑनलाइन अपॉइंटमेंट, बाह्यरुग्ण व आंतररुग्ण व्यवस्थापन, प्रयोगशाळा अहवाल, औषध वितरण, देयके तसेच वैद्यकीय अभिलेखांचे डिजिटल व्यवस्थापन आदी सेवा एकाच व्यासपीठावर उपलब्ध होत आहेत. रुग्णसेवा अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी या प्रणालीचा प्रभावी पद्धतीने विकसित वापर करण्यावर भर देण्यात आला.

महानगरपालिकेने मध्‍यवर्ती खरेदी खात्‍यामार्फत ४ प्रमुख रूग्‍णालयात वैद्यकीय सुविधेसाठी चार ‘एमआरआय मशीन्‍स’ खरेदी केल्‍या आहेत. त्‍यापैकी के.ई.एम. रूग्‍णालयातील एमआरआय मशीनच्‍या स्‍थापत्‍य कामांबाबत आढावा घेऊन जलद गतीने कामे करण्‍याचे निर्देश डॉ. विपिन शर्मा यांनी दिले.

केईएम रूग्‍णालयास १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्‍याचे औचित्‍य साधून कर्करोगावरील उपचारासाठी रूग्‍णालयातील पेट स्‍कॅन मशीन आधुनिकरण व वैद्यकीय औषधोपचार सुविधा उपलब्‍ध करून देण्‍यासाठी लगतच्‍या टाटा कर्करोग रूग्‍णालयासोबत सर्वंकष आढावा घेऊन संयुक्‍त विद्यमाने दर्जोन्‍नती करण्‍यासाठी वस्‍तुस्थिती अहवाल सादर करावा, असे निर्देश डॉ. शर्मा यांनी दिले.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here