*कोकण व पुणे विभागीय सांख्यिकी प्रशिक्षण कार्यशाळा तळेगाव येथे संपन्न*
नवी मुंबई दि.१२(विमाका):- महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागांतर्गत असलेल्या अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयाद्वारे राज्यामध्ये प्रथमच आयोजित करण्यात येत असलेल्या नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (PLFS) आणि असंघटित क्षेत्रातील उद्यमांचे वार्षिक सर्वेक्षण (ASUSE) या अत्यंत महत्त्वपूर्ण मोहिमेचा पाया घालणारी विभागीय प्रशिक्षण कार्यशाळा राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था (NIPHT), तळेगाव दाभाडे येथे नुकतीच यशस्वीरीत्या संपन्न झाली आहे.
कोकण व पुणे विभागातील क्षेत्रीय कामासाठी नियुक्त केलेल्या अन्वेषक व पर्यवेक्षकांसाठी दि. ०५ जून २०२६ ते १० जून २०२६ या कालावधीत ही पाच दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, ज्याचे उद्घाटन अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय, मुंबईच्या आयुक्त डॉ. ज्योत्स्ना पडियार (भा.प्र.से.) यांच्या हस्ते झाले.
एप्रिल २०२६ ते मार्च २०२७ या कालावधीत चालणाऱ्या या संपूर्ण सर्वेक्षणांतर्गत संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण ६ हजार ८२८ नमुना घटकांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, हे काम २७६ अन्वेषक व निरीक्षकांमार्फत पूर्ण केले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने कोकण व पुणे विभागाचा विचार करता, शहरी आणि ग्रामीण भाग मिळून एकूण २ हजार ९५६ नमुना घटकांचे सर्वेक्षण निश्चित करण्यात आले असून, हे उद्दिष्ट ७५ अन्वेषक आणि २८ पर्यवेक्षकांच्या पथकाद्वारे पूर्ण केले जाईल.
या महत्त्वपूर्ण उद्घाटन प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी ऑनलाइन व्हिडिओ प्रणालीद्वारे उपस्थित राहून आपले मार्गदर्शनपर विचार मांडले. त्यांनी स्पष्ट केले की, या दोन्ही सर्वेक्षणांतून गोळा होणारी आकडेवारी ही ग्रामपातळी, जिल्हा आणि थेट विभागस्तरावरील विविध कल्याणकारी योजना व अचूक धोरण निर्मितीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, त्यामुळे नागरिकांनी प्रगणकांना अचूक माहिती देऊन सहकार्य करावे.
‘विकसित भारत @ २०४७’ चे ध्येय साध्य करण्यासाठी आणि पुराव्यांवर आधारित डेटाचा (एव्हिडन्स बेस्ड डेटा) उपयोग करून शासनाला धोरणात्मक निर्णय घेणे सोपे जावे, या दृष्टीने हा प्रशिक्षण कार्यक्रम म्हणजे सर्वेक्षणाच्या यशस्वी अंमलबजावणीची एक भक्कम पायाभरणी असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO FOD) पुणे येथील सहसंचालक डॉ. रुही कुलकर्णी यांनी केले.
सेवानिवृत्त अतिरिक्त महासंचालक अशोक टोपराणी यांनी देशाच्या एकूणच आर्थिक प्रगतीचे मोजमाप करण्यामध्ये या दोन्ही सांख्यिकी सर्वेक्षणांचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी व आयुक्त डॉ. ज्योत्स्ना पडियार यांनी अधिक सविस्तर माहिती देताना सांगितले की, ‘विकसित भारत @ २०४७’ नुसार आता जिल्हा हे विकासाचे मुख्य केंद्र बनले आहे. त्यामुळे जिल्हास्तरीय रोजगार-बेरोजगार आकडेवारी, असंघटित क्षेत्रातील उद्योगांची अचूक संख्या आणि रोजगार निर्मिती यांसारख्या निर्देशकांची सांख्यिकीय माहिती याद्वारे उपलब्ध होईल, जी राज्य व जिल्ह्याचा उत्पन्नाचा अंदाज तयार करण्यास आणि शासनाच्या विविध योजना आखण्यास उपयुक्त ठरेल.
या पाच दिवसीय निवासी प्रशिक्षणादरम्यान ‘Ipsos Research Pvt. Ltd. Mumbai’ या बाह्यसंस्थेकडून नियुक्त करण्यात आलेल्या प्रगणक व पर्यवेक्षकांना रोजगाराची रचना, कामगार सहभाग दर, तसेच असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे स्वरूप, आर्थिक स्थिती, उत्पन्न व खर्च यांसारख्या तांत्रिक संकल्पनांचे सखोल ज्ञान देण्यात आले, तसेच ‘CAPI’ तंत्रज्ञानाचा वापर करून ‘Tablet’ वर थेट माहितीची अचूक नोंदणी कशी करावी याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक व प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षण सोहळ्याच्या व्यासपीठावर मुख्य कार्यालयाचे सहआयुक्त भीष्म बिरादार, विभागीय आयुक्त कार्यालय पुणेचे सहआयुक्त (नियोजन) संजय मरकळे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या उपआयुक्त प्रियांका बोकील आणि इप्सॉस (Ipsos) संस्थेच्या संचालक तृप्ती शर्मा प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय, कोकण विभागाचे सहआयुक्त जयसिंग मेहेत्रे यांनी केलेल्या प्रास्ताविकाने झाली, तर संपूर्ण कार्यशाळेचे आभार प्रदर्शन प्रादेशिक कार्यालय पुणे येथील प्रभारी सहआयुक्त वृषाली माकर यांनी केले.
0000000000












