क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचार व कार्याचा अभ्यास व चिंतन आवश्यक!
अग्रलेख ,शीतल हरीष करदेकर
विद्येविना मती गेली।
मतीविना नीती गेली।
नीतीविना गती गेली।
गतीविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।
महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले हे १९ व्या शतकातील एक महान विचारवंत, समाज सेवक, लेखक, क्रांतिकारी समाजसुधारक होते.
महात्मा फुलेंच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या या ओळींनी संपुर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवली होती.
● महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षाची ११ एप्रिलपासून सुरु झाली आहे.या महामानवाला शतदा वंदन!
‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र “या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे” अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या ‘शेतकऱ्याचा असूड’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता ,ती आजच्या किती राजकीय नेत्यांनी वाचली असेल माहित नाही. लोकांनी दिलेली पत्र, अडचणी सोडवण्यासाठी घेतलेल्या बैठका , पहाणी दौरे, अधिवेशनात चर्चिलेले विषय यांचं नक्की फलित काय …हे नेमक्या व सहज शब्दात लोकांना किती समजतं ,हा भारी मोठा अभ्यासाचा विषय नाही. पण अनेकदा ‘कथनी और करनी’मधे फरक दिसतो.कुणातरी झारीतल्या शुक्राचार्याने गडबड केलेली असते किंवा कुंपणच झोपेचं सोंग घेते.
*मतीविना गती गेली…*
वर्चस्ववाद हा सत्ता, पैसा याच्या अहंकारातून अनीतिने ,असंवेदनशीलतेने तयार होतो ; पण तो येतो झुंडीने, दमनाची अस्त्र घेऊन! जे काम करायचं ते थोडं बाजूला करुन फक्त ‘अतिस्वहिताचा विचार मतीवर आरुढ होतो, तेव्हाच खरी गती थांबते.’
महात्मा फुले असतील किंवा महर्षी धोंडो केशव कर्वे असतील; या गुरुतुल्य महनीय व्यक्तींनी स्त्री शिक्षण आणि स्त्रीच्या जगण्याला अर्थ दिला.
आज महात्मा फुले आणि महर्षी कर्वे यांचा विचार व आचार वारसा किती जपलाय आपण?
हा विचार मनात येतोच.
● *स्त्रीचा आदर लेकीबाळींना संरक्षण*
शाळेत मुलींचं शोषण होतं, सामुहिक बलात्कारानंतर मुलगी आत्महत्या करते!
विडिकामगार महिला किमान वेतन नाही म्हणून त्रस्त ..कशा सक्षम माता होतील या भगिनी? कसं कुटुंब सुखी न मुलं शिक्षित होतील? उसतोड.महिलांचं शोषण होतं,अत्याचार होतो,गर्भार महिलांची संख्या त्या काळात वाढते…यावर अधिवेशना सभागृहात चर्चा होते…कायदा व्हावा म्हणून उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे चांगला पुढाकार घेतात!
तर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
हाती असलेली माहिती देताना, म्हणतात की,
“उच्च न्यायालयाच्या १७ मार्च २०२५ रोजी दिलेल्या निर्देशांनुसार शासनाने २८ एप्रिल २०२५ रोजी परिपत्रक काढून जिल्ह्यात समिती स्थापन केली आहे. या समित्यांमध्ये विविध विभागांचा समावेश असून, ‘गर्भवती महिलांना ऊसतोडीस पाठवू नये’ अशा स्पष्ट सूचना उच्च न्यायालयाने दिल्या आहेत. महिलांचा रोजगार बुडू नये म्हणून भरपाईसाठी स्वतंत्र योजना तयार करण्याचा विचार सुरू आहे.
अहो दादा, “महिलांवर अत्याचार होतो हा विषय आहे; शोषणाने महिला गर्भवती होऊ नये यावर मार्ग काढायचाय!”..काय म्हणाव याला?
सुधारणेचे जळजळीत अंजन आणि शेतकऱ्यांचा आसूड स्वतःला तथाकथित लोकप्रतिनिधीं म्हणणार्या सोकाॅल्ड दांभिकांना बसले पाहिजेत.
राजकारण गजकर्णाहून भयंकर अवस्थेत म्हणजे भगेंदर पातळीवर पोहोचले आहे. बुडाला आलेला फोड झाकताना ‘डुबेंगे तो सनम , तुम्हे लेकर डुबेंगे’ असा माज डोक्यात ठेवत सदा लटकत असलेल्या ‘वट वाघूळ’ अवस्थेत आपल्याच मस्तीत चेहर्यावर अंधार पांघरून सुशेगात जगतात, कर्णकर्कश ओरडतात!
अशा प्रकारच्या परिस्थितीत सर्व सामान्य जनतेचे हित किती होणार? याचा विचारही अशक्य आहे.
● *एकनाथी भारुडात जगण्याचं सार व फटका*
*’इव्हेट’ मधे बुडलेल्या भल्या लोकांसाठी, जनहित साधू पहाणाऱ्यांसाठी हे विशेष भारुड, आहे.
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना!
आले संत घरी तरी काय बोलुन शिणवावे?
ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावे?
प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावे?
गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे?
अरे कृष्णा..
सद्गुरू सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा?
नित्य देव भेटला म्हणून काय जगाशी दावावा?
घरचा दिवा झाला म्हणून काय आढ्याशी बांधावा?
एका जनार्दनी म्हणे हरी हा गुप्तची ओळखावा!
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना!
हे भारुड त्यावेळच्या समाजातील खोटेपणा,दांभिकता यांच्यावर ओढलेले सणसणीत कोरडे आहेत !
● पाचशे वर्षांपुर्वीची माणसेसुध्दा आतापेक्षा फारशी वेगळी नसावीत. त्यांनी कोणता अविचार किंवा हावरेपणा करू नये हे संत एकनाथ सांगतात. विवेक आणि संयम बाळगण्याबद्दल सांगून झाल्यावर शेवटी ते पुन्हा अध्यात्माच्या मुद्द्यावर येतात आणि ‘असा कोणाला दाखवण्यातून देव दिसत नसतो, त्याला ज्याने त्याने अंतरात ओळखायचा असतो’ हे सांगतात.
आपले लोक काया,मन बुध्दीने अशा दांभिकांना शरण जातात तेव्हा धर्म कोणताही असो तिथे विवेक आणि नीतिमत्ता संपते.ईश्वरी वैश्विक शक्तीचा बाजार आणि धर्मांधतेचा काळा जिहाद होतो.
इथेही स्त्रीच बळी जाते. शोषली जाते…
ही लढाई म्हणजे धर्मयुद्ध नाहीच.
ही आहे दुष्टचक्र विरोधातील लढाई…ती कठोरपणे सुरु रहायला हवीच.
घराघरातून जागरुकता निर्माण व्हायला हवी.
●*नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला!!!
नाशिक पोलिसांनी गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ हे ब्रीदवाक्य वापरून राबवलेली धडक कारवाई सध्या चर्चेत आहे. अशोक खरात आणि रवींद्र एरंडे यांसारख्या संशयित आरोपींना अटक करून त्यांची ‘खास’ पद्धतीने धिंड काढल्यामुळे गुन्हेगारी जगतात भीती निर्माण झाली आहे असं म्हणतात.
पोलिसांच्या या ‘मिशन क्लीनअप’ला सामान्य नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक आणि पाठिंबा मिळत आहे या कडक कारवाईमुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले अनेकजण फरार झाले आहेत
रवींद्र एरंडेने चौकशीनंतर हात जोडत गुन्ह्याची कबुली दिली आणि कायद्याचा धाक दाखवला
अशोक खरातला पोलिसांनी धडा शिकवला, ज्यामुळे ‘न्याय सर्वांसाठी समान’ हा संदेश गेला
ही कारवाई नाशिकमध्ये कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे .
● *नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला पुन्हा गाजला; एरंडे प्रकरणात पोलिसांचा धडाका सुरु आहे.*
या तथाकथित कायद्याच्या बालेकिल्ल्यात म्हणजे नाशिकमधील एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषणाचे आणि छळाचे गंभीर प्रकरण समोर आले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत ९ गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी ६ आरोपींना अटक केली आहे.
नाशिकच्या मुंबई नाका परिसरातील एका नामांकित आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक आणि मानसिक छळ होत असल्याचे उघड झाले आहे.
पीडित महिलांवर धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आल्याचे आणि धार्मिक भावना दुखावल्याचे गंभीर आरोपही समोर आले आहेत. काही महिलांना बळजबरीने नमाज पठण करायला लावणे किंवा मांसाहार खाण्यास भाग पाडणे असे प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
नाशिक पोलिसांनी इतर पीडित महिलांना तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक ९१२३२३२३११ किंवा कंट्रोल रूम क्रमांक ११२ जारी केला आहे.
हा विषय महिलांना ट्रॅपमधे ओढण्याचा आहे. आणि तो त्या पध्दतीने सोडवणे आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.
यात संवेदनशीलपणे मुळापर्यंत काम होणे अपेक्षित आहे. ओरडा आरड करुन झालेले नुकसान परत येणार नाही.
● याच कंपनीत नाही तर आपल्या महाराष्ट्रातील खाजगी कंपन्यातून एक जागरुक महिला सेल तयार करुन असे काही घडत असेल तर वेळीच त्या पीडितेला सावध करुन आधार देणे आवश्यक आहेच.
नोकरी जाण्याची भीती आणि इतर कारणे या मागे असतात.
कामाचे ठिकाण कोणतेही असो तिथे महिलांसाठी सुरक्षित वातावरण असणे आवश्यक आहे तसेच पुरुषांनाही सुरक्षित वातावरणाची गरज आहे.
कोणताही विषय आक्रस्ताळेपणाने कायमचा सुटत नाही. तर त्यासाठी चांगली विद्या आणि नीतीमत्तेची गरज आहे.
पण माणसं सतत कारस्थानं आणि राजकारणात बुडली तर सगळंच कठीण होऊन बसतं.
समानता समभाव हा सगळ्याचा फायद्याचा !
अविद्या ही खूप वाईट काम करुन देते..त्याचे परिणाम व प्रतिक्रिया तितक्याच वाईट असतात.
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर किती लिहावं तितकं कमीच.
पण थोडा जरी त्यांच्या विचारांचा कार्याचा अभ्यास व चिंतन आपण करु तितकं चांगलं!
म्हणजे अनर्थ होणे कमी होईल!
***



















