Home Trending Now युवाशक्तीला दिशा संवादातूनच मिळते* -सचिन देव

युवाशक्तीला दिशा संवादातूनच मिळते* -सचिन देव

88
0

*युवाशक्तीला दिशा संवादातूनच मिळते*
-सचिन देव
ज्यांना क्रांतीची सर्वाधिक गरज असते, तेच क्रांती घडवतात असे नेहमीच नसते. अनेकदा अन्याय सहन करणारा वर्ग भीती, दडपशाही, असहायता किंवा परिस्थितीमुळे संघर्ष करू शकत नाही. अशा वेळी त्या वेदनेशी समरस होणारे, पण त्या वर्गाचा भाग नसलेले काही लोक परिवर्तनाचे नेतृत्व करतात आणि इतिहासाला नवी दिशा देतात.

इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत. कामगारांच्या हक्कांसाठी कार्ल मार्क्स यांनी विचारांची दिशा दिली; ते स्वतः कारखान्यातील मजूर नव्हते. विधवा विवाहाच्या चळवळीसाठी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी आयुष्य वाहिले; ते स्वतः विधवा नव्हते. स्त्रियांच्या समान हक्कांसाठी जॉन स्टुअर्ट मिल यांनी प्रभावी भूमिका घेतली; ते स्त्री नव्हते. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते,परिवर्तन घडवण्यासाठी केवळ वेदना पुरेशी नसते; त्यासाठी संवेदनशीलता, दूरदृष्टी आणि कृतीची तयारी आवश्यक असते.

कालच्या CJP आंदोलनाने हाच विचार पुन्हा एकदा अधोरेखित केला. अनेक तरुण वर्षानुवर्षे “राजकारण हा आपला विषय नाही” असे म्हणत सार्वजनिक प्रश्नांपासून दूर राहिले होते. पण जेव्हा तेच तरुण एका सामायिक प्रश्नासाठी संघटितपणे उभे राहिले, तेव्हा त्यांनी प्रस्थापित व्यवस्थेलाही त्यांच्या आवाजाची दखल घ्यायला भाग पाडले. या आंदोलनाचे खरे यश केवळ एखादी मागणी मान्य होण्यात नाही, तर सामान्य नागरिक एकत्र आले तर लोकशाहीत सकारात्मक बदल घडवू शकतात, हा आत्मविश्वास निर्माण करण्यात आहे.

यातून एक महत्त्वाचा प्रश्न पुढे येतो,आजच्या Gen Z पिढीला आपण खरोखर समजून घेत आहोत का?

Gen Z ही केवळ एक पिढी नाही; ती प्रचंड ऊर्जा, वेगवान विचार आणि अमर्याद शक्यतांचा प्रवाह आहे. या पिढीतील अनेकजण शिक्षण घेत आहेत, तर अनेक करिअरच्या उंबरठ्यावर उभे आहेत. त्यांचे बालपण डिजिटल युगात गेले. अनेक घरांमध्ये पालक नोकरी-व्यवसायाच्या धावपळीत असल्यामुळे संवाद कमी झाला. परिणामी ही पिढी स्वतंत्र विचार करणारी, आत्मविश्वासू, प्रश्न विचारणारी आणि मनातले स्पष्टपणे मांडणारी बनली. ‘ओठात एक आणि मनात एक’ अशी भूमिका तिला सहज स्वीकारता येत नाही. मोठ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या अजून पूर्णपणे खांद्यावर नसल्यामुळे काही वेळा तिच्यात बेधडकपणा किंवा बेफिकिरीही दिसून येते; पण त्याचा अर्थ ती दिशाहीन आहे, असा होत नाही.

म्हणूनच आज या पिढीशी अनुभवी लोकांनी संवाद साधण्याची नितांत गरज आहे. कारण युवाशक्ती ही नदीच्या पाण्यासारखी असते. नदीच्या पाण्याचे योग्य नियोजन करून धरणे आणि कालवे बांधले, तर तेच पाणी गावोगावी पोहोचते, शेतीला जीवन देते आणि भूमी सुजलाम-सुफलाम करते. अगदी पुराच्या काळातही योग्य व्यवस्थापनामुळे तेच पाणी विनाश घडवण्याऐवजी लोकांच्या उपयोगी पडते. पण नियोजन नसेल, तर तीच नदी विध्वंस घडवू शकते.

युवाशक्तीचेही हेच आहे. तिच्या ऊर्जेला योग्य दिशा, विश्वास आणि संवाद मिळाला, तर ती समाजाचे भविष्य घडवते. पण दुर्लक्ष, तुटलेला संवाद, अविश्वास आणि सततचा संघर्ष यांमुळे तीच ऊर्जा चुकीच्या दिशेने वाहण्याचा धोका असतो.

आज समाजकारणी, राजकारणी, शिक्षक, पालक आणि समाजातील अनुभवी व्यक्ती यांच्यासमोरचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे या नव्या पिढीला बदलण्याचा प्रयत्न करणे नाही; तर तिला समजून घेणे आहे. पारंपरिक चौकटीच्या खिडकीतून बाहेर येऊन त्यांच्या भाषेत, त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या विचारविश्वात प्रवेश करावा लागेल. उपदेशापेक्षा संवाद, आदेशापेक्षा सहभाग आणि अविश्वासापेक्षा विश्वास या तीन गोष्टी आज अधिक आवश्यक आहेत.

कोणतीही पिढी स्वतःहून चांगली किंवा वाईट नसते. तिला मिळणारे संस्कार, संवाद आणि दिशा तिचे स्वरूप घडवतात. आजची Gen Z ही उद्याचा समाज, उद्याचे नेतृत्व आणि उद्याचा भारत घडवणारी पिढी आहे. तिच्या ऊर्जेला योग्य दिशा देणे ही केवळ तिची जबाबदारी नाही; ती संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.

कारण युवाशक्तीला दिशा संवादातून मिळते; संघर्षातून नाही. आणि फोडाफोडीच्या राजकारणातून तर कधीच नाही. हेच आजचे त्रिवार सत्य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here