मुंबई
नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) येथे ५ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता लिटल थिएटरमध्ये ‘पेज टु स्टेज ‘ अंतर्गत ‘मंजुभारती’ हा विशेष साहित्यिक कार्यक्रम सादर होणार आहे. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवयित्री-लेखिका डॉ. मंजुषा कुलकर्णी (मंजुभारती) यांच्या साहित्यविश्वावर आधारित हा कार्यक्रम रसिकांना शब्द, स्वर आणि रंगांचा बहुरंगी अनुभव देणार आहे.
अभिनेत्री मधुरा वेलणकर आणि निवेदिका-अभिनेत्री समीरा गुजर यांच्या प्रभावी काव्यअभिवाचनातून निवडक कविता सादर करणार आहेत.
फुलां अन् चंद्रावरील , स्त्रीजीवनाच्या विविध भावछटांवर आधारित कविता तसेच ललित लेखनातील निवडक अंश रसिकांसमोर उलगडणार आहेत.
या कार्यक्रमाची संकल्पना, लेखन आणि सादरीकरण स्वतः डॉ. मंजुषा कुलकर्णी (मंजुभारती) यांची असून कविता, अभिवाचन आणि भावगायनाच्या माध्यमातून त्या आपल्या साहित्यविश्वाचा हळुवार प्रवास घडवून आणणार आहेत.
कार्यक्रमाचे आणखीन वैशिष्ट्य म्हणजे प्रसिद्ध चित्रकार शेफाली भुजबळ यांचे थेट चित्ररेखाटन! निवडक कवितांच्या भावविश्वाला रंगरेषांतून साकारत त्या शब्दांना दृश्य रुप देणार आहेत.
हा कार्यक्रम स्त्रीमनाच्या संवेदनशीलतेचा आणि सौंदर्यदृष्टीचा कलात्मक आविष्कार रसिकांना अनुभवता येणार आहे.
एनसीपीएतर्फे सर्व साहित्यप्रेमी आणि कला-रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेश विनामूल्य असून ‘प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य ’ तत्त्वावर आसनव्यवस्था राहील.

















