Home मुंबई *जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ‘माझी मुंबई’...

*जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ‘माझी मुंबई’ या संकल्पनेवर आधारित महापौर आयोजित बालचित्रकला स्पर्धेचे रविवार दि. १ मार्च २०२६ रोजी आयोजन*

45
0

*- मुंबई महानगरात ५१ ठिकाणी आयोजित होणार स्पर्धा*

*- पाच गटांमध्ये होणार विद्यार्थ्यांचे विभाजन*

‘जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ‘माझी मुंबई’ या संकल्पनेवर आधारित माननीय महापौर आयोजित बालचित्रकला स्पर्धेचे बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे दरवर्षी आयोजन करण्यात येते. यंदादेखील माननीय महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनानुसार ही बालचित्रकला स्पर्धा रविवार, दि. १ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे. मुंबई महानगरात ५१ मैदाने आणि उद्यानांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत सुमारे एक लाख विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली असून, स्पर्धेच्या दिवशी सुद्धा विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

यंदा एकूण पाच गटांत ही स्पर्धा होणार आहे. प्रत्येक गटातील प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास २५ हजार रुपयांचे बक्षीस, पदक तसेच प्रशस्तिपत्र देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांस प्रत्येकी २० हजार रुपये आणि पदक तसेच प्रशस्तिपत्र, तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांस १५ हजार रुपये आणि पदक तसेच प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक गटातील प्रत्येकी दहा विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून प्रत्येकी ५ हजार रुपये आणि पदक तसेच प्रशस्तिपत्र देण्यात येणार आहे. तसेच विभाग स्तरावर प्रत्येक गटात ५ याप्रमाणे २५ अशी एकूण २५ प्रशासकीय विभागांमध्ये ६२५ उत्तम चित्रांना प्रत्येकी ५०० रुपयांचे रोख पारितोषिके आणि पदक देण्यात येणार आहेत.

एकूण ५ गटांत ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेअंतर्गत इयत्ता पहिली व दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या गट क्रमांक १ करिता ३ विषय ठरविण्यात आले आहेत. यामध्ये ‘माझा चांदोमामा’, ‘माझी मनीमाऊ’, ‘मी माझ्या घरात’ असे ३ विषय आहेत. तर इयत्ता तिसरी व चौथीतील विद्यार्थ्यांसाठीच्या गट क्रमांक २ करिता ‘मी झाडावर चढतो’, ‘मी फुलांच्या बागेत’, ‘मी आईसोबत लाडू बनवितो’, असे विषय आहेत.

इयत्ता पाचवी व सहावीतील विद्यार्थ्यांसाठीच्या गट क्रमांक ३ करिता ‘आम्ही जंगलात फिरतो’, ‘आम्ही परग्रहावर’, ‘आम्ही शिवरायांचे मावळे’, असे विषय आहेत. इयत्ता सातवी व आठवीतील विद्यार्थ्यांसाठीच्या गट क्रमांक ४ करिता ‘आम्ही नदीच्या पाण्यात पोहतो’, ‘आमची वेषभूषा स्पर्धा’, ‘माझा आवडता मैदानी खेळ’, असे विषय आहेत. तर इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या गट क्रमांक ५ करिता ‘पर्यावरण संवर्धन’, ‘माझी प्रगतिशील सुंदर मुंबई’, ‘गड संवर्धन’, असे विषय आहेत.

सर्व शाळांमधील अधिकाधिक विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन उप आयुक्त (शिक्षण) प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी सुजाता खरे, शिक्षणाधिकारी कीर्तीवर्धन किरतकुडवे, प्राचार्य दिनकर पवार यांनी यांनी केले आहे.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here