Home मुंबई *मुंबई (मध्य) प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये चारचाकी खासगी वाहनांसाठी एमएच ०१ एफडी आगाऊ...

*मुंबई (मध्य) प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये चारचाकी खासगी वाहनांसाठी एमएच ०१ एफडी आगाऊ मालिका सुरू*

53
0

मुंबई
प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) येथे चारचाकी खाजगी परिवहनेतर (४W LMV NT) वाहनांसाठी एमएच 01 एफडी ही नवीन आगाऊ नोंदणी मालिका सुरू करण्यात आली आहे. सध्या सुरू असलेली एमएच ०१ एफबी मालिका लवकरच संपुष्टात येत असून, त्याऐवजी ही नवीन मालिका नियमित करण्याचा प्रस्ताव आहे.

महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील सुधारित नियम ५४ (अ) नुसार वाहनधारकांना पसंतीचा किंवा आकर्षक नोंदणी क्रमांक आगाऊ शुल्क भरून आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध आहे. कार्यालयीन विहित नमुन्यातील अर्जाद्वारे कोणताही उपलब्ध वाहन क्रमांक आरक्षित करता येतो. यासाठी विहित शुल्काचा धनाकर्ष “प्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई (मध्य)” किंवा “Regional Transport Office, Mumbai (Central)” यांच्या नावे सादर करणे आवश्यक आहे.

आरक्षित केलेल्या वाहन क्रमांकाची वैधता १८० दिवसांची असून, या कालावधीत संबंधित वाहनाची नोंदणी करणे बंधनकारक आहे. वाहन क्रमांक आरक्षित करण्यासाठी आवश्यक अर्ज प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या खिडकी क्रमांक ई-१८ वर उपलब्ध असून, अर्जदारांना आवश्यक मार्गदर्शनासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

वाहन क्रमांक आरक्षित केल्यानंतर त्याची पावती वाहन-०४ प्रणालीमध्ये वाहनाच्या डेटा एंट्रीदरम्यान नोंदविल्यास, त्या वाहनास आरक्षित केलेला क्रमांक प्रदान करण्यात येतो.

 

यासाठी १) फोटो असलेले ओळखपत्र, २) निवासाचा पुरावा, ३) पॅनकार्ड आणि ४) वाहन खरेदीची पावती आवश्यक आहे.

 

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाहनधारकांना आवाहन केले आहे की, सोमवार, दि.१६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत एमएच ०१ एफडी या नवीन मालिकेतील पसंतीचा वाहन क्रमांक आरक्षित करण्यासाठी खिडकी क्रमांक ई-१८वर शितल शेंडगे यांच्याकडे विहित नमुन्यातील अर्ज व शुल्क सादर करावे.

एका क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास, त्याच दिवशी दुपारी २ वाजता लिलाव पद्धतीने संबंधित वाहन नोंदणी क्रमांक जारी करण्यात येणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी (अ.का.), प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) यांनी दिली आहे.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here