Home Uncategorized *महायुतीला मत म्हणजे धारशिवच्या विकासाला मत!*

*महायुतीला मत म्हणजे धारशिवच्या विकासाला मत!*

102
0

*जेवळीतील भव्य सभेत योजनांचा मांडला लेखाजोखा*

*शेतकरी–महिला–युवकांसाठी मोठ्या घोषणा*

*धाराशिवच्या विकासाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मांडले संकल्पचित्र*

धाराशिव

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जेवळी येथील बसवेश्वर हायस्कूल मैदानावर भव्य जाहीर सभा पार पडली. हजारोंच्या संख्येने उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकारी, उमेदवार व नागरिकांसमोर बोलताना शिंदे यांनी महायुती सरकारच्या योजना, विकासकामे, शेतकरी, महिला, युवक आणि ग्रामीण भागासाठी घेतलेल्या निर्णयांचा सविस्तर लेखाजोखा मांडत येत्या सात तारखेला महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी त्यांनी महात्मा बसवेश्वरांना वंदन केले तर, दिवंगत अजित दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.

“दुःखाचं सावट असतानाही कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे मी इथे आलो आहे. लाडक्या बहिणींना, भावांना भेटून येत्या सात तारखेला महायुतीचे उमेदवार जिल्हा परिषद व पंचायत समितीवर पाठवा, हीच विनंती करण्यासाठी आलो आहे,” असे त्यांनी सांगितले.

शिंदे म्हणाले की, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका या गावाशी थेट जोडलेल्या असून लोकसभा, विधानसभा, नगर परिषद व महापालिका निवडणुकांप्रमाणेच या निवडणुकांमध्येही महायुतीला भरभरून पाठिंबा मिळेल. “आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री घडवणारे हेच कार्यकर्ते आहेत. त्यामुळे ही तुमची स्वतःची निवडणूक समजून काम करा,” असे आवाहन त्यांनी केले.

अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातील कामकाजाचा उल्लेख करत ते म्हणाले, “पायाला भिंगरी लावून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. जिथे संकट, आपत्ती, गरज होती तिथे मी पोहोचलो.” लाडकी बहिण योजनेतून महिलांना आर्थिक आधार देण्यात येत असल्याचे सांगत त्यांनी या योजनेसाठी वर्षाला सुमारे ४५ हजार कोटी रुपयांचा खर्च होत असल्याचे नमूद केले. लखपती योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार, बचतगट, छोटे उद्योग व व्यवसाय उभे करण्यास प्रोत्साहन दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

एसटी तिकिटात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत त्यांनी प्रवास सुलभ केल्याचा दावा केला. मुलींच्या मोफत उच्च शिक्षणाचा उल्लेख करताना एका इंजिनिअरिंग शिकणाऱ्या मुलीच्या आत्महत्येनंतर सरकारने १०० टक्के फी माफीचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे त्यांनी भावूक शब्दांत सांगितले.

शेतकरी सन्मान योजनेतून केंद्र व राज्य सरकारकडून मिळून शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपये दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. पीकविमा, अतिवृष्टी नुकसानभरपाई आणि सिंचन प्रकल्पांना गती देण्याचे निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “कर्जमाफीसाठी समिती गठित केली आहे. निर्णय घेताना शेतकऱ्यांना दिलासा देणारच,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित” अभियानांतर्गत तीन कोटी महिलांची आरोग्य तपासणी करून हजारो महिलांचे प्राण वाचवले गेल्याचा उल्लेख त्यांनी केला. महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेची मर्यादा दीड लाखांवरून पाच लाखांपर्यंत वाढविल्याचेही त्यांनी नमूद केले.

दावोस येथे सुमारे ३० लाख कोटी रुपयांचे करार झाल्याचे सांगत त्यांनी महाराष्ट्र इंडस्ट्री-फ्रेंडली राज्य असल्याचा दावा केला. “पन्नास लाख तरुणांना रोजगार देण्याचा आमचा संकल्प आहे. जिल्ह्यात छोटे-मोठे उद्योग, एमआयडीसी आणि पर्यटन प्रकल्प उभे करून स्थानिकांना स्थानिक रोजगार देणार,” असे त्यांनी स्पष्ट केले.

मराठवाडा वॉटर ग्रिड पुन्हा सुरू करून ‘दुष्काळवाडा’ हा शब्द पुसून टाकण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला. उमरगा पंचायत समितीची नवी इमारत, लोहरा व उमरगा तालुक्यांसाठी एमआयडीसी व मेडिसिटी, निम्न तेरणा प्रकल्पावर पर्यटन केंद्र, ग्रामीण रस्त्यांसाठी २६ कोटी रुपयांचा निधी, १९ ग्रामपंचायत इमारतींसाठी तरतूद, ४९४ पाणीपुरवठा योजनांसाठी सुमारे ८० कोटी रुपये, तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासाठी ६० कोटी रुपये तसेच दलित वस्ती सुधारणा, जनसुविधा, वैयक्तिक शौचालये, औषधी सुविधा आणि संत सेवालाल महाराज योजनेसाठी कोट्यवधींचा निधी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

“आम्ही जे बोलतो ते करतो. आश्वासन देत नाही, काम करून दाखवतो,” असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहायता निधीतून साडेचारशे कोटी रुपये देऊन हजारो लोकांचे प्राण वाचविल्याचा उल्लेख केला.

“धनुष्यबाण, भाजप, राष्ट्रवादी आणि रिपाइंच्या अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी उभे रहा. बंडखोर, बोगस उमेदवारांना मत देऊ नका. निवडून आलेल्यांकडून काम करून घेण्याचा अधिकार तुमच्याकडे आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

*सात तारखेला इतिहास घडवण्याचा निर्धार*

समारोप करताना त्यांनी पुन्हा एकदा ठाम शब्दांत सांगितले, “ही निवडणूक तुमच्या मुलाबाळांच्या भवितव्याची आहे. महायुतीला मत म्हणजे विकासाला मत. सात तारखेला इतिहास घडवा आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीवर महायुतीचा भगवा फडकवा असे आवाहन केले.

यावेळी परिवहन मंत्री तथा धारशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक, संपर्कप्रमुख राजन साळवी, माजी आमदार न्यानराज चौगुले, भगवान देवकाते आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी आवर्जून उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here