Home पालघर-ठाणे / नवी मुंबई / रायगड / रत्नागिरी / सिंधुदुर्ग *मतदान केंद्रांवरील मुलभूत सुविधा व मनुष्यबळाचे प्रभावी नियोजन करावे*

*मतदान केंद्रांवरील मुलभूत सुविधा व मनुष्यबळाचे प्रभावी नियोजन करावे*

67
0

*प्रचार कालावधी संपताच जाहिरात फलक, झेंडे व तत्सम सर्व साहित्य तातडीने हटवावे*

*अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांचे निर्देश*

*महानगरपालिका मुख्‍यालयात उप आयुक्‍त, सहायक आयुक्‍त यांची बैठक संपन्‍न!*

“बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ ही पूर्णतः निर्भय, मुक्त, पारदर्शक व शिस्तबद्ध वातावरणात पार पडावी, यासाठी महानगरपालिका प्रशासन व निवडणूक यंत्रणा पूर्णतः कटिबद्ध आहे. त्‍यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना राबविण्यात येत आहेत. निवडणूक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यासाठी सर्वंकष व व्यापक तयारी करण्यात आली आहे. प्रशासकीय विभागनिहाय सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. मतदान केंद्रांवरील मुलभूत सुविधा सुनिश्चित करणे तसेच मनुष्यबळाचे नियोजन व व्यवस्थापन प्रभावीपणे पार पाडणे ही जबाबदारी उप आयुक्त व सहायक आयुक्त यांची राहील. याबाबत कोणतीही कसूर खपवून घेतली जाणार नाही.” असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. निवडणूक प्रचार कालावधी संपुष्टात येताच जाहीरात फलक, झेंडे, प्रचार साहित्य व तत्सम सर्व साहित्य तातडीने काढून टाकावेत. कोणताही विलंब अथवा दुर्लक्ष सहन केले जाणार नाही.” असेदेखील डॉ. अश्विनी जोशी यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवार, दि. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून मतमोजणी शुक्रवार, दि. १६ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. या अनुषंगाने महानगरपालिका उप आयुक्‍त, सहायक आयुक्‍त यांची समन्‍वय बैठक शनिावार दि १० जानेवारी २०२६) संपन्‍न झाली. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी अध्‍यक्षस्‍थानी होत्‍या.

महानगरपालिका मुख्‍यालयात पार पडलेल्‍या या बैठकीस विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) श्री. विजय बालमवार, सहआयुक्‍त (करनिर्धारण व संकलन) श्री. विश्‍वास शंकरवार, उप आयुक्त (सामान्य प्रशासन) श्री. किशोर गांधी, अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी (कोकण विभाग) श्रीमती फरोग मुकादम, सहायक आयुक्‍त (करनिर्धारण व संकलन) श्री. गजानन बेल्‍लाळे यांच्‍यासह परिमंडळ उप आयुक्‍त, सर्व प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्‍त उपस्थित होते.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी म्‍हणाल्‍या की, “मुंबई महानगर प्रदेशात (MMR REGION) निवडणूक कर्तव्‍यावर कार्यरत कर्मचा-यांकरीता टपाली मतदानाची सुविधा मध्‍यवर्ती निवडणूक कार्यालय (CPS) येथे करण्‍यात आली आहे. निवडणूक कर्तव्‍यावरील अधिकारी – कर्मचारी, पोलिस अंमलदार यांनी या सुविधेचा लाभ घ्‍यावा. मतदान केंद्रे निश्चित झाली असून काही मतदान केंद्रे बदलण्‍यात आली आहेत. त्‍याबाबत मतदार, उमेदवार, राजकीय पक्ष यांना अवगत करावे. त्‍याबाबत व्‍यापक प्रसिद्धी करावी. मतदान केंद्र व आजूबाजूचा परिसर स्‍वच्‍छ व सुंदर ठेवावा. मतदान प्रक्रिया सुरळीत, शांततामय वातावरणात पार पडेल याची सर्वोतोपरी खबरदारी घ्‍यावी. मतदानाच्‍या दिवशी सुमारे ४ हजार ५०० स्‍वयंसेवकांची नियुक्‍ती करण्‍यात येणार आहे. मतदार रांग लावणे, गर्दी व्‍यवस्‍थापन, दिव्‍यांग / ज्‍येष्‍ठ नागरिकांना मदत करणे आदींंसाठी त्‍यांचे सहकार्य घ्‍यावे.

मतदानानंतर मतदान साहित्‍य, मतदान यंत्रे अभिरक्षा कक्ष (STRONG ROOM) पर्यंत पोहोचविण्‍याकामी वाहतूक व्‍यवस्‍था तैनात आहे. या वाहनांसाठी वाहनतळ सुविधा उपलब्‍ध करून द्यावी. त्‍याबाबत पोलिस, वाहतूक पोलिस, प्रादेशिक परिवहन विभाग यांच्‍याशी समन्‍वय साधावा. निवडणूक निर्णय अधिकारी (R.O) यांनी मतमोजणी केंद्र आराखडा, विविध सुविधांचा प्रस्‍ताव सादर केला आहे. परिमंडळ उप आयुक्‍त, सहायक4 आयुक्‍त यांनी त्‍याबाबतचे सुनियोजित व्‍यवस्‍थापन करावे. मतदानाच्‍या ४८ तास अगोदर म्‍हणजेच मंगळवार, दि.१३ जोनवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता जाहीर प्रचार संपुष्‍टात येणार आहे. निवडणूक प्रचार कालावधी संपुष्टात येताच जाहीरात फलक, झेंडे, प्रचार साहित्य व तत्सम सर्व साहित्य तातडीने काढून टाकावेत. स्थिर पाळत पथक (Static Survelliance Team), भरारी पथक (Flying Squad Team) यांनी अधिक सक्रिय रहावे. कोणताही विलंब अथवा दुर्लक्ष सहन केले जाणार नाही.” असा इशारादेखील डॉ. अश्विनी जोशी यांनी दिला आहे.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here