Home Uncategorized धनश्रीदीदी तळवलकर यांना सरदार पटेल विद्यापीठाची डि. लिट्.

धनश्रीदीदी तळवलकर यांना सरदार पटेल विद्यापीठाची डि. लिट्.

96
0

स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख आणि पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या सुकन्या धनश्रीदीदी तळवलकर यांना नुकतेच मानद डॉक्टर ऑफ लेटर्स, अर्थात डि. लिट्. या पदवीने सन्मानित करण्यात आले. गुजरातच्या वल्लभ विद्यानगर येथील सुप्रसिद्ध सरदार पटेल विद्यापीठाने ही मानद पदवी सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल धनश्रीदीदींना प्रदान केली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतिदिनी म्हणजे १५ डिसेंबरच्या दिवशी गुजरातचे राज्यपाल मा. आचार्य देवव्रत यांच्या हस्ते सरदार पटेल विद्यापीठाच्या दीक्षांत समारोह सोहळ्यात वल्लभ विद्यानगर, आणंद येथे धनश्रीदीदींना ही पदवी अर्पण करण्यात आली. वैश्विक स्वाध्याय परिवारासाठी तसेच महाराष्ट्रासाठी दीदींना ही पदवी अर्पण होणे हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे हे निश्चित. पांडुरंगशास्त्री किंवा धनश्रीदीदी यांनी कुठला पुरस्कार किंवा सन्मान मिळावा या अपेक्षेने कधीच कुठले सत्कार्य किंवा रचनात्मक कार्य केले नाही. त्यामुळेच अशा निरपेक्ष, निःस्वार्थ भावनेने विधायक कार्य करणाऱ्या दीदींसारख्या व्यक्तिमत्त्वाचा एका सुप्रतिष्ठित विद्यापीठाने गौरव करणे ही वस्तुतः खूप अभिमानाची गोष्ट आहे.

या पदवी अर्पण समारोहानंतर त्याच दिवशी सायंकाळी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (NDDB) यांच्या भावपूर्ण निमंत्रणावरून धनश्रीदीदींचे ‘आयुष्य सुंदर करण्यासाठी गीतेची शिकवण’ या विषयावर एक व्याख्यान नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले. आपल्या गीतेवरील एक तासापेक्षा अधिकच्या प्रवाही संवादाने दीदींनी बोर्डाचा कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग तसेच उपस्थित असलेल्या स्वाध्याय परिवारातील प्रतिनिधींना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here