*डॉ. गोऱ्हे कामकाज कागदपत्रे समितीचा अहवाल हिवाळी अधिवेशनात येण्याची शक्यता*
मुंबई
महाराष्ट्र विधानमंडळाच्या कामकाज कागदपत्रे समितीच्या अध्यक्षपदी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आहेत. लक्ष्यवेधी, प्रशनोत्तरे , औचित्य , विशेष ऊल्लेख, समित्यांचे अहवाल यांना सादर करण्यास जो विलंब होतो त्यांचा आढावा घेऊन त्याला गती देण्याचे काम ही समिती करते. गेले काही महिने या समितीने सातत्याने आढावा घेऊन त्याची अंमलबजावणीच व शिफारसी यांचा महत्त्वपूर्ण अहवाल येत्या हिवाळी अधिवेशनात पटलावर ठेवला जाणार असल्याचे समजते. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या लक्षवेधी, विविध विभागाचे अहवाल, विविध आयुधे सूचनांच्या निपटाऱ्याला गती देण्यासाठी हा अहवाल महत्वाचा ठरणार आहे.
डॉ. गोऱ्हे समितीने गेल्या काही महिन्यांत १० पेक्षा अधिक बैठका घेऊन सन २०१२ आणि त्यापूर्वीच्या सर्व लक्षवेधी सूचनांवरील विभागीय उत्तरांचे अंतिमीकरण केले आहे. अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांना प्रशासनिक स्तरावर योग्य न्याय मिळत नव्हता; मात्र सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर या प्रकरणांचा मोठा भाग मार्गी लागला आहे. हिवाळी अधिवेशनात हा अहवाल मांडल्यानंतर विधानमंडळातील प्रलंबित कामकाजाला नवा वेग मिळेल.
कामकाजातील आश्वासने व विविध आयुधांच्य उत्तरांच्या गुणवत्तेबाबत आमदारांनी व्यक्त केलेल्या नाराजीवर कामकाज सल्लागार समितीत चर्चा झाली. विभागांना लक्ष्यवेधी सूचना उशिरा पोहोचल्याने अचूक आणि सखोल उत्तर देण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध होत नाही, अशी अडचण पुढे आली होती. यावर तोडगा म्हणून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला, की ‘विधीमंडळ सचिवालयाने पिठासन अधिकाऱ्यांना
मंजूर केलेल्या लक्षवेधी सूचना कामकाजात दुसऱ्या दिवशी घेण्याच्या आदल्या दिवशी दुपारी ४ वाजेपर्यंत मंजुर करून संबंधित विभागास पाठवण्यात याव्यात . ‘
या निर्णयामुळे विभागांना विषयाचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल, आवश्यक तपशील गोळा करता येतील आणि आमदारांच्या प्रश्नांना अधिक दर्जेदार व वेळेवर उत्तर देता येईल. ही सुधारणा विधानमंडळाच्या कामकाजातील पारदर्शकता आणि कार्यक्षमतेला चालना देणारी ठरणार आहे.
दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला गती देण्यासाठी सभापती राम शिंदे यांच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत सभा ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता नागपूर विधानमंडळात होणार असल्याची माहितीही मिळाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याबैठकीस आॅनलाईन ऊपस्थित राहणार आहेत . या आगामी अधिवेशनाच्या तयारीवर शिक्कामोर्तब करण्यास ही बैठक महत्वाची आहे. बैठकीनंतर ना. राम शिंदे व डॅा.नीलम गोर्हे नागपुर विधीमंडळ परिसरात पहाणीही करणार आहेत.
डॉ. गोऱ्हे समितीचा अहवाल, लक्षवेधी सूचनांच्या प्रक्रियेत झालेला बदल आणि नागपूर अधिवेशनाच्या तयारीसाठी होणारी उच्चस्तरीय बैठक—हे सर्व मिळून विधानमंडळाच्या कामकाजाला अधिक गतिमान आणि प्रभावी बनवणार आहेत.

















