*’नागरी आपत्ती जोखीम सक्षमता’ कार्यशाळेचे उद्घाटन*
*तीन दिवसीय कार्यशाळेसाठी जगभरातील तज्ज्ञ, अभ्यासकांची उपस्थिती*
“नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांचा सामना करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सदैव सज्ज आणि सक्षम आहे. आपत्ती निवारण अंतर्गत जोखमींचे सौम्यीकरण करण्यासाठी नदी पुनरुज्जीवन योजना, ब्रिमस्टोवॅड प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया केंद्रे अशा अनेक महत्वाकांक्षी पायाभूत सुविधांवर भर देण्यात येत आहे. तथापि, जोखीम सौम्यीकरणासाठी जगभरात सुरू असलेले संशोधन, अत्याधुनिक उपाययोजना आदींचा स्वीकार करून मुंबईकर नागरिक आणि पर्यायाने मुंबई महानगरास अधिकाधिक सुरक्षित, सक्षम बनविण्यासाठी महानगरपालिका सदैव प्रयत्नशील आहे.” असे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी नमूद केले.
बृहन्मुंबई महानगरपालिका, संयुक्त राष्ट्रसंघाचे आपत्ती जोखीम सौम्यीकरण कार्यालय (United Nations Office For Disaster Risk Reduction) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नागरी आपत्ती जोखीम सक्षमता’ (Urban Disaster Risk Resilience) या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेचे दिनांक ८ ते १० सप्टेंबर २०२५ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी गगराणी बोलत होते.
या उद्घाटन सत्रावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल सूद गोयल, संयुक्त राष्ट्रसंघाचे आपत्ती जोखीम सौम्यीकरण कार्यालयाचे जागतिक शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्रमुख संजय भाटिया, कार्यक्रम व्यवस्थापन अधिकारी मुतालिका प्रुक्सापॅंग, इंचाव एनव्हायरनमेंटल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष डॉ. गईवून कोई, केपीएमजी संस्थेचे भागीदार तथा शासकीय आणि सार्वजनिक सेवा प्रमुख नीलाचल मिश्रा आदी मान्यवरांसह बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध शासकीय व निमशासकीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
उद्घाटन सत्रामध्ये विविध मान्यवरांनी आपत्कालीन परिस्थिती आणि जोखीम सौम्यीकरणबाबत विचार मांडले.
प्रमुख मार्गदर्शन करताना महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक गगराणी म्हणाले की, “बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला आपत्कालीन व्यवस्थापनाचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि सर्वोत्तम उपाययोजना राबवण्याचा विश्वास आहे. तथापि, त्यावर समाधान न मानता, जागतिक स्तरावरील आपत्कालीन व्यवस्थापनाची धोरणे, संशोधन, उपाययोजना आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे महत्त्वाचे आहे. आजच्यापेक्षा अधिक आणि उत्तम आपत्कालीन व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. वेळीच उपाययोजना केल्या तर संभाव्य नुकसान कमी करता येते तसेच संभाव्य दुर्घटना टाळता येतात. मुंबईवर अनेक मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित संकटे आली. अशा आपत्तीकाळात मुंबईकरांचा प्रतिसाद आणि त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची सक्षमता नेहमीच वाखाणली गेली आहे. आपत्तीसमयी चोरी, लूटमार, अत्याचार असे अनुचित प्रसंग मुंबईत घडलेले नाहीत. आपत्कालीन परिस्थितीतही, मुंबईकरांचे मनोधैर्य आणि परस्परांना मदतीची भावना अधिक मजबूत असते. संकटाच्या काळातही मुंबईकर एकोप्याने उभे राहतात.” अशा शब्दांत गगराणी यांनी मुंबईकरांचे कौतुक केले.
मिश्रा म्हणाले की, “आपत्कालीन परिस्थितीत जोखमीची व्याप्ती समजून घेणे, प्रशासनाचे प्रयत्न समजून घेणे, आपत्तीविषयक पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणे, स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी पूर्वतयारी करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. प्राणहानीसोबतच वित्तहानी टाळणे तसेच पायाभूत सुविधांचे नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी उपाययोजना असायला हवी.” असेही ते म्हणाले.
भाटिया म्हणाले की, “बदलते वातावरण, वाढती लोकसंख्या आदींच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील संभाव्य संकटांचा सामना करण्यासाठी आता उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. जोखीम सौम्यीकरणासाठी प्रयत्न करणे म्हणजे भविष्यातील मोठे वित्तीय नुकसान रोखणे होय. त्यामुळे, शहरांना जोखमीच्या अनुषंगाने सक्षम (resilient) करणे ही एकप्रकारची गुंतवणूक समजून विविध यंत्रणांनी प्रयत्न करावे.” असे आवाहनही त्यांनी केले.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी प्रास्ताविक केले. उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य तथा आपत्कालीन व्यवस्थापन) शरद उघडे यांनी आभार मानले.
कार्यशाळेत, भाटिया यांनी ‘मेकिंग सिटीज् रेजिलियंट -२०३०’ या विषयावर मार्गदर्शन केले. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) महेश नार्वेकर यांनी ‘मुंबईतील आपत्ती आणि उपाययोजना’ या विषयावर सविस्तर माहिती दिली. तर, गिफ्ट सिटीचे प्रमुख राजीव शर्मा यांनी ‘मेकिंग सिटीज् रेजिलियंट २०३० अँट गिफ्ट सिटी’ याबाबत माहिती दिली.

















