*जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित ‘क्रीडा व हवामान – एक महत्त्वपूर्ण संवाद’ चर्चासत्रातील सूर*
*महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ए. बी. डिव्हिलियर्स, सिने अभिनेत्री दिया मिर्झा आदींचा चर्चासत्रात सहभाग*
आंतरराष्ट्रीय महानगर असलेल्या मुंबईमध्ये विकासाकडे धाव घेत असताना पर्यावरणाचे संतुलन राखून भावी पिढ्यांसाठी अधिक हरित, सुरक्षित, निरोगी आणि हवामान बदलाला सामोरी जाणारी मुंबई घडवूया, असा सूर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शुक्रवार दि. ५ जून २०२६ रोजीआयोजित ‘क्रीडा व हवामान – एक महत्त्वपूर्ण संवाद’ या विषयावरील चर्चासत्रात व्यक्त करण्यात आला.
महानगरपालिकेचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि प्रोजेक्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या प्रांगणात सायंकाळी हे चर्चासत्र पार पडले.
या चर्चासत्रात महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, दक्षिण आफ्रिकेचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ए. बी. डिव्हिलियर्स, सिने अभिनेत्री तथा संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदिच्छा दूत दिया मिर्झा, प्रोकॅम इंटरनॅशनलचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक विवेक सिंग, प्रोजेक्ट मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संस्थापक शिशिर जोशी यांनी सहभाग घेतला. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन पत्रकार श्रीमती रिचा पिंटो यांनी केले.
चर्चासत्रात सहभागी तज्ज्ञांनी प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण आणि त्यावरील उपाययोजना याबाबत सविस्तर चर्चा केली. या चर्चासत्राच्या आधी प्रोजेक्ट मुंबईद्वारे मुंबई क्लाइमेट वीक २०२७ ची घोषणा करण्यात आली.
महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश खणकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते तथा जी उत्तर प्रभाग समितीचे अध्यक्ष यशवंत किल्लेदार, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे, स्थापत्य समिती (शहर) अध्यक्षा यामिनी जाधव, बाजार व उद्यान समिती अध्यक्षा हेतल गाला, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उप आयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उप आयुक्त (पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग) प्रदीप गवळी, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी आदींसह विविध अधिकारी उपस्थित होते.
महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे म्हणाल्या, वातावरणात सातत्याने बदल होत आहे. हा बदल आपण लक्षात घेणे गरजेचे आहे. या महानगराची गरज लक्षात घेवून विविध विकासकामे करताना प्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिका प्रशासन विविध उपाययोजना राबवत असते. मेट्रोसारखा लोकोपयोगी प्रकल्प राबवित असताना काही झाडांचे स्थलांतर करण्यात आले. ही बहरलेली झाडे रोपवाटिकेत जोपासण्यात आली. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आता त्याच झाडांचे पुन्हा एकदा रोपण करण्यात आले. विकासात्मक भूमिका निभावत असताना या महानगराची पालकसंस्था या नात्याने महानगरपालिकेने सतत वृक्षारोपणावर भर दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुंबईच्या विकासासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. यासोबतच मुंबई महानगर स्वच्छ ठेवूया, असा संदेशही त्यांनी दिला.
दक्षिण आफ्रिकेचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ए. बी. डिव्हिलियर्स यांनी मुंबईला लाभलेल्या नितांत सुंदर समुद्र किनाऱ्याबाबत मत व्यक्त केले. ते म्हणाले, मुंबईची नैसर्गिक संपत्ती म्हणजे अथांग पसरलेला समुद्र आणि तितकेच सुंदर समुद्र किनारे आहेत. या किनाऱ्यांचे नैसर्गिक सौंदर्य अधिक खुलून दिसण्यासाठी तिथे सतत स्वच्छता मोहीम राबवायला हवी. यावेळी त्यांनी खास मराठीत ‘कसं काय मुंबई’ म्हणत प्रेक्षकांशी संवाद साधला. मुंबईत येण्यासाठी मी सतत तयार असतो. ‘मुंबई के लिए कुछ भी करेगा’ असं म्हणत त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
सिने अभिनेत्री तथा संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदिच्छा दूत श्रीमती दिया मिर्झा म्हणाल्या, मुंबईमध्ये जानेवारी, फेब्रुवारीत जवळपास सगळ्याच शाळांमध्ये क्रीडा महोत्सव घेण्यात येतात. मात्र याच दिवसांमध्ये वातावरणात खूप प्रतिकूल बदल होत असतात. त्यामुळे हे महोत्सव पावसाळ्यानंतर घेण्याची विनंती विविध शाळांनी केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच युवा पिढीलाही पर्यावरणाचे महत्त्व पटवून द्यायला हवे. यासोबतच घराघरातून दररोज तयार होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण सगळ्यांनी प्राथमिक स्तरावर केले, तर महानगरपालिकेला देखील पुढील कामात त्याची मोठी मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
प्रोकॅम इंटरनॅशनलचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक विवेक सिंग यांनी सायकलिंगचे महत्त्व विशद केले. मुंबई खूप धकाधकीचे महानगर आहे. या महानगरात प्रगती करायची असेल तर प्रत्येकाने व्यायाम करण्यावर भर द्यायला हवा, असे त्यांनी सांगितले.
प्रोजेक्ट मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संस्थापक शिशिर जोशी यांनी चर्चासत्राची प्रस्तावना केली. मुंबई क्लायमेट वीक बाबत त्यांनी माहिती दिली. मुंबई महानगर सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने आठवड्यातून स्वच्छतेसाठी एक तास देणे गरजेचे आहे, असा विचार त्यांनी मांडला. सर्वांच्या प्रयत्नाने आपली मुंबई ही आणखी प्रगती साधू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या चर्चासत्रानंतर महानगरपालिकेच्या प्रांगणात महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, ए. बी. डिव्हिलियर्स, दिया मिर्झा, विवेक सिंग, शिशिर जोशी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
***

















