Home Uncategorized *पश्चिम उपनगरातील रूग्णांसाठी कूपर रूग्णालयात रक्तचाचणीसाठी अद्ययावत संयंत्र उपलब्ध*

*पश्चिम उपनगरातील रूग्णांसाठी कूपर रूग्णालयात रक्तचाचणीसाठी अद्ययावत संयंत्र उपलब्ध*

69
0

*रक्तातील बायोकेमिस्ट्री विश्लेषण करणाऱ्या स्वयंचलित संयंत्राचे लोकार्पण*

*दैनंदिन ४,५०० तर वर्षापोटी १२ लाख चाचण्या हाताळण्यासाठी संयंत्र उपयुक्त ठरणार*

पश्चिम उपनगरातील नागरिकांसाठी रक्तचाचणी अद्ययावत सुविधा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डॉ. रू. न. कूपर रूग्णालयात उपलब्ध झाली आहे. आर्थिकदृष्ट्या गरजू रूग्णांसाठी दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे. अद्ययावत आणि अधिक क्षमता असलेल्या रक्तातील बायोकेमिस्ट्री विश्लेषण करणाऱया स्वयंचलित संयंत्राचा लोकार्पण सोहळा डॉ. रू. न. कूपर रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य सेवांमध्ये रक्तचाचणीच्या माध्यमातून निदान हा आरोग्य सेवांमधील एक महत्वाचा भाग आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रूग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने हे एक महत्वाचे पाऊल असल्याचे रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांनी सांगितले. संयंत्राच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडचे प्रतिनिधी . संजीव रंजन, विजय तावडे आणि चाईल्ड हेल्थ फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक जिजी जॉन, अब्दुल बेग आदी मान्यवरांसह रूग्णालयाच्या विविध विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

रक्तातील बायोकेमिस्ट्री विश्लेषण करणाऱया स्वयंचलित संयंत्रासाठी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीमार्फत कॉर्पोरेट सामाजिक बांधिलकी (सी.एस.आर.) अंतर्गत अर्थसहाय्य प्राप्त झाले आहे. चाईल्ड हेल्थ फाऊंडेशन संस्थेने हा प्रकल्प कार्यान्वित केला आहे.

एकाचवेळी अनेक प्रकारचे रक्ताचे नमुने जलद गतीने विश्लेषण करण्याची या संयंत्राची क्षमता आहे. शिवाय रोगनिदान रक्त चाचणीची माहिती संयंत्रामध्ये साठवता येणे शक्य आहे. परिणामी, डॉक्टरांना वैद्यकीय परिक्षण आणि योग्य निदान व उपचार करण्यासाठी हे संयंत्र उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे रूग्णांना अचूकरित्य उपचार देणे शक्य होईल, अशी माहिती बायोकेमिस्ट्री विभागाचे प्रमुख डॉ. शिवाजी माने यांनी दिली. दिवसापोटी रक्तचाचणी प्रयोगशाळेत ४ हजार ५०० ते ५ हजार इतक्या रक्ताच्या नमुन्यांची चाचणी होते. तर वर्षापोटी १२ लाखांहून अधिक रक्त चाचण नमुने प्रयोगशाळेतून तपासले जातात. रूग्णालयात रक्तचाचणीसाठी दैनंदिन उपलब्ध होणाऱया रक्ताच्या नमुन्यांपेक्षा अधिक संख्येने रक्तचाचणीचे नमुने तपासणे या संयंत्रामुळे शक्य होणार आहे.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here