मुंबई:
राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी आज शालेय शिक्षण मंत्री मा. ना. दादासाहेब भुसे यांची मंत्रालयातील शासकीय बंगल्यावर भेट घेऊन मुंबई शहरात वाढत्या खाजगी कोचिंग क्लासेसच्या अनधिकृत इंटिग्रेटेड कोर्सेसविरोधात तातडीने शासकीय कारवाई करण्याची लिखित मागणी केली.
या भेटीत ॲड. मातेले यांनी खालील गंभीर बाबी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या अनधिकृत कोर्सेसचा धंदा अनेक खाजगी कोचिंग क्लासेस कॉलेजशी संगनमत करून ११वी-१२वी साठी इंटिग्रेटेड अभ्यासक्रम चालवतात. त्यामध्ये लाखो रुपयांचे शुल्क घेतले जाते, जे पूर्णपणे व्यावसायिक व बेकायदेशीर स्वरूपाचे आहे.
कॉलेज शिक्षणाचे खोबरे या क्लासेसमुळे विद्यार्थी कॉलेजला उपस्थित राहत नाहीत. केवळ नावापुरती नोंद ठेवली जाते, हजेरी बनावट दाखवली जाते.
प्रॅक्टिकल शिक्षणाचा अभाव: विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक आणि प्रयोगशाळा शिक्षण मिळत नाही, जे शैक्षणिक निकषांनुसार आवश्यक आहे. मानसिक आरोग्याचे संकट: विद्यार्थी व पालक यांच्यावर अभ्यासाचा ताण, तासन्तास चालणाऱ्या क्लासेसमुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. शासन मान्यतेशिवाय कारभार: शासनाची कोणतीही अधिकृत मान्यता नसतानाही असे कोर्सेस निर्भीडपणे सुरू आहेत, हे शिक्षण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.
ॲड. मातेले यांनी मांडलेल्या मुख्य मागण्या मुंबईतील सर्व इंटिग्रेटेड कोचिंग क्लासेसवर चौकशी व तपासणी. हजेरी बनावट दाखवणाऱ्या महाविद्यालयांवर शिस्तभंगात्मक कारवाई.शालेय शिक्षण संचालनालयामार्फत अशा अभ्यासक्रमांवर बंदी.विद्यार्थ्यांच्या हितासाठी धोरणात्मक निर्णय व नियमावली तयार करणे. या संपूर्ण व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठित करणे.
या भेटीनंतर ॲड. मातेले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “विद्यार्थ्यांचे भावी आयुष्य, शिक्षणाची गुणवत्ता आणि पालकांचा विश्वास हे खाजगी शिकवणीच्या या अनिर्बंध धंद्यात भरडले जात आहेत. शिक्षण ही सामाजिक जबाबदारी असून, ती बाजारू नफा आणि बनावट व्यवस्थेला बळी पडता कामा नये.”
शालेय शिक्षण मंत्री मा. दादासाहेब भुसे यांनी देखील या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली असून, लवकरच संबंधित विभागाला चौकशीचे निर्देश दिले जातील, असे आश्वासन दिले.

















