*राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे*
मुंबई दि. 20 फेब्रुवारी
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना एका प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे त्यामुळे अजित पवार यांनी कोकाटे यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे.
महेश तपासे बोलताना म्हणाले की, आता अजित पवार म्हणू शकणार नाही की गुन्हा सिद्ध होऊ द्या. आता तर कृषी मंत्री यांच्यावर गुन्हा ही सिद्ध झाला असून जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षाही सुनावली आहे. भाजप प्रणित सरकारने नैतिकतेचे उत्तम उदाहरण देता कोकाटे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा अशी मागणी तपासे यांनी केली.
महेश तपासे पुढे म्हणाले शिंदे सरकारची लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींच्या उत्कृष्टासाठी कधीच नव्हती ती फक्त निवडणुका जिंकण्यासाठी योजना होती. आता राज्य सरकारला लाडक्या बहिणींचा विसर पडला असून एक एक नवीन निकष लावत लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्याचा डाव राज्य सरकारचा आहे. अशाप्रकारे लाडक्या बहिणीची घोर फसवणूक विद्यमान सरकारने केल्याचे तपासे यांनी बोलून दाखवले.
राजकीय फायद्यासाठी लागू करण्यात आलेल्या या योजनेसाठी दरवर्षी ४५ हजार कोटी कुठून आणायचे असा प्रश्न आता वित्तमंत्री अजितदादांना पडलाय. लाडक्या बहिणीची मतं घेताना जे भरभरून आश्वासन देत होते तेच आता जाचक अटी लावून भगिनींची संख्या कमी कशी करता येईल याच्या शोधात असल्याचा टोला महेश तपासे यांनी लगावला.
वास्तव्यात लाडक्या बहिणींची काळजी राज्य सरकारला नाही. राज्यात महिलांविरोधात मोठ्या प्रमाणात अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे तसेच महिला व तरुणी मोठ्या प्रमाणात बेपत्ता होत आहे मात्र राज्य सरकारला या संदर्भात काहीही पडलेलं नाही असा आरोपही शरद पवारांच्या प्रवक्त्याने केला.
राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत असताना या संदर्भात राज्य सरकार कुठलेही ठोस पावलं उचलत नाही आहे याची खंत तपासे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासंदर्भात सध्याच्या विद्यमान सरकारकडे कुठलेही व्हिजन नाही असा आरोप महेश तपासे यांनी केला.
बाबा सिद्दिकी व सैफ अली खान प्रकरणानंतर सामान्य नागरिक भयभीत अवस्थेत असताना आता थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आलेली धमकी राज्य सरकारने अतिशय गांभीर्याने घ्यावी अशी मागणी तपासे यांनी केली. समाजात मोकाट फिरत असलेले गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकांचा चांगला बंदोबस्त सरकारने करावा अशी मागणी ही त्यांनी केली.
गुन्हेगारांवर वचक ठेवण्यात गृह विभाग अपयशी ठरत आहे व त्यामुळे राज्यात नागरिक, उद्योगपती व राज्यकर्ते भयभीत असल्याचा दावा तपासे यांनी केला. महाराष्ट्र भयमुक्त करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे असे महेश तपासे म्हणाले.
२०१९ मध्ये उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रीपदी निवड व आग्रह शरदचंद्र पवार साहेबांनी केला व ती निवड भविष्यकाळात योग्य ठरली व देश पातळीवर उद्धव ठाकरे यांचे कौतुक झाले याची आठवण महेश महेश तपासे यांनी खासदार संजय राऊत यांना करून दिली.
एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर केलेले कंत्राट भाजप आता थांबत आहे व चौकशी लावत आहे. भाजपासाठी आता एकनाथ शिंदे यांची उपयुक्तता संपली व त्यामुळे असं घडत असल्याचा टोला तपासे यांनी लगावला.

















