*काँग्रेस विधी मंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची टीका*
*महायुती सरकार मध्ये विविध प्रकरणाची चौकशी म्हणजे कुरघोडीचे राजकारण*
*मंत्री मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, वडेट्टीवार यांची मागणी*
नागपूर , दि. 20- विधान सभा निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणींना अँडव्हान्स मध्ये पैसे देण्यात आले, सरकार आल्यावर आता मात्र लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी कमी केले जात आहेत. गरज सरो आणि वैद्य मरो अशी फसवणूक महायुती सरकारने केल्याची टीका विधी मंडळ काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
नागपूर मध्ये पत्रकारांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले , सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना मत विकत घेण्यासाठी सरसकट महिलाना पैसे देण्यात आले, आता सरकार आल्यावर मात्र विविध अटी लावून लाभार्थी महिलांची संख्या कमी केली जात आहे. लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या ही २५ टक्के पर्यंत आणणार ,अस महापाप सरकार करत आहे. या सरकारला या बहिणीच जागा दाखवू शकतात अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
एकनाथ शिंदे यांनी जे निर्णय घेतले त्याची चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहे. हे महायुती मधील मतभेद आहेत.महायुती सरकारचा कारभार स्वच्छ असणार असा नारा मुख्यमंत्र्यांनी दिला, त्याची सुरुवात एकनाथ शिंदे यांच्या निर्णयापासून झाली आहे. महायुती सरकारमध्ये कुरघोडीचे राजकारण जोरात सुरू आहे, जनतेला मात्र वाऱ्यावर सोडले अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
या सरकार मध्ये भांडण जास्त आहे. शेतकऱ्यांना, महिलाना नुसती आश्वासन दिली. ही काम कधी होणार याची शाश्वती नाही पण एकमेकांशी भांडून जनतेच्या प्रश्नावरून लक्ष मात्र विचलित केलं जात आहे, असा आरोप ही वडेट्टीवार यांनी केला. धनंजय मुंडे यांच्यावर अंजली दमानिया यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत , दमानिया या पुराव्यानिशी बोलत आहे त्यामुळे या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी अस वडेट्टीवार म्हणाले.

















