#द्वारकानाथ_संझगिरी यांचे आज (६ फेब्रुवारी २०२५ रोजी ) निधन झाले.*
#द्वारकानाथ_संझगिरी यांचा अल्पपरिचय.*
जन्म.१५ नोव्हेंबर १९५० दादर मुंबई येथे.
द्वारकानाथ संझगिरी यांनी मुंबईतून किंग जॉर्ज हायस्कूल व रुईया कॉलेजमधून शिक्षण घेतल्यावर,त्यांनी माटुंग्याच्याच व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्नाॅलाॅजिकल इन्स्टिट्यूटमधून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.पेशानं सिव्हिल इंजिनीयर असलेले संझगिरी मुंबई महापालिकेत उच्च पदावर कार्यरत होते.पण क्रिकेट आणि मराठी साहित्यातल्या रुचीनं त्यांच्यातला क्रिकेट समीक्षक घडवला.मराठी क्रिकेटरसिकांनी त्यांच्या लिखाणाला नेहमीच पसंतीची दाद दिली. संझगिरी यांनी पत्रकारिता क्षेत्रात अनेक दैनिकांमधून लेखन केले.क्रिकेट आणि अन्य खेळ, चित्रपट, प्रवास, पर्यटन आणि इतर अनेक सामाजिक विषयांवर द्वारकानाथ यांचे लेख मराठी-इंग्रजी वृत्तपत्रांतून आणि साप्ताहिकांमधून १९८० सालापासून प्रकाशित होत आहेत.आतापर्यंत त्यांची २५ हून आशिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.यात खेळ, क्रीडा, चित्रपट, ललित, प्रवासवर्णन, व्यक्तिचित्रण यांचा समावेश आहे.१९८३ ते २०११ पर्यंत झालेल्या सर्व क्रिकेटच्या विश्वचषकांचे प्रत्यक्ष त्या देशात जाऊन त्यांनी वार्ताकन केले आहे.द्वारकानाथ संझगिरी यांनी क्रिकेटर्स आणि चित्रपट तारे-तारकांवर अनेक कार्यक्रम केले.त्या कार्यक्रमाच्या निवेदनाची धुरा तेच सांभाळत.त्यासाठी आपल्या अनुभवातून, अभ्यास-व्यासंगातून त्या कार्यक्रमाचे निवेदनही स्वतःच लिहित.मुळातच प्रतिभावंत लेखक असल्यानं आणि लेखनातील त्यांच्या खुसखुशीत शैलीमुळे उपमा, उत्प्रेक्षा, उदाहरणं देत, प्रासंगिक राजकीय घटना व्यक्तींवर टिप्पणी करीत त्यांचा मासला देत आपला मुद्दा पटवून देण्याच्या त्यांच्या हातोटीमुळे त्यांचं निवेदन पुनः ऐकावंसं वाटे.त्यांच्या निवेदनातील ताजेपणामुळे ते कार्यक्रमही टवटवीत होत. द्वारकानाथ संझगिरी यांच्या अशा दृकश्राव्य सांगीतिक कार्यक्रमाच्या निवडक निवेदनांचं संपादन त्यांच्या पत्नी सुप्रिया संझगिरी यांनी केलं आहे.यात ‘संगीत षटकार’,’ट्रिब्यूट टू लिजंड – देव आनंद’,’ट्रिब्यूट टू लिजंड – शम्मी कपूर’,’मधुबाला ते माधुरी दीक्षित’आणि ‘सचिन की फर्माइश’ अशा पाच निवेदनांचा अंतर्भाव आहे.द्वारकानाथ संझगिरी यांना दत्ता हलसगीकर साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा साहित्यिक पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य संघाचा उत्कृष्ट लेखन पुरस्कार, विद्याधर गोखले साहित्य पुरस्कार क्रीडा विषयक लेखनासाठी विश्वनाथ वाबळे पुरस्कार, वृत्तपत्र लेखन संघाचा पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले.
द्वारकानाथ संझगिरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.


















