Home मुंबई *ठाणे सामान्य रुग्णालयाच्या कामाचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा*

*ठाणे सामान्य रुग्णालयाच्या कामाचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा*

11
0

*रुग्णालयाच्या वीज जोडणीचे काम ‘फास्टट्रॅक’वर करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश*

मुंबई, २८: ठाणे आणि लगतच्या पालघर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना जागतिक दर्जाच्या आणि अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ठाणे येथील ९०० खाटांचे अत्याधुनिक जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय आणि सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या प्रकल्पाचे कामकाज अत्यंत वेगाने आणि ‘फास्टट्रॅक’ पद्धतीने पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत दिले.

उपमुख्यमंत्री यांच्या समिती कक्षात झालेल्या या बैठकीत ठाणे सिव्हील हॉस्पिटलच्या सद्यस्थितीचा आणि आतापर्यंत झालेल्या कामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर, मंत्री सर्वश्री दादाजी भूसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई, संजय शिरसाट, संजय राठोड, प्रताप सरनाईक यांच्यासह उपमुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, आरोग्य विभागाचे सचिव ई. रविंद्रन, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यावेळी उपस्थित होते.

प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यातील कामांची गती वाढवत असतानाच प्रशासकीय पातळीवर दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी यावेळी संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले.

रुग्णालयाची इमारत पूर्ण झाली असून वीज जोडणी अभावी रुग्णालयाचे काम सुरू करता येत नसल्याचा मुद्दा यावेळी चर्चेत आल्यानंतर रुग्णालयासारख्या अत्यावश्यक सेवेसाठी आवश्यक असणारी वीज जोडणीची सर्व कामे विहित वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले. याशिवाय, रुग्णालयाच्या इमारतीची नियमित व उच्च दर्जाची स्वच्छता, रुग्णालयात लागणाऱ्या अद्ययावत वैद्यकीय यंत्रसामुग्रीची तातडीने खरेदी तसेच काही दिवसांपूर्वी शासनाकडून मंजूर करण्यात आलेली १०७८ नवीन पदे वेळेत भरण्याची संपूर्ण प्रक्रिया गतीमान करावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

या महत्त्वाकांक्षी अशा ९०० खाटांच्या विशाल संकुलामध्ये ५०० खाटांचे मुख्य जिल्हा रुग्णालय, २०० खाटांचे स्वतंत्र महिला व बाल रुग्णालय तसेच २०० खाटांचे संदर्भ सेवा रुग्णालय एकाच छताखाली कार्यरत राहणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी, नेफ्रोलॉजी आणि ऑनकोलॉजी यांसारख्या अत्यंत महत्त्वपूर्ण व गंभीर आजारांच्या उपचारांसाठी सुपरस्पेशालिटी विभाग उपलब्ध असणार आहेत. एवढेच नव्हे तर, आपत्कालीन व गंभीर रुग्णांच्या उपचारांसाठी रुग्णालयाच्या इमारतीच्या टेरेसवर विशेष ‘हेलीपॅड’ची रचना करण्यात आली असून, तेथे एअर अ‍ॅम्बुलन्स सहज उतरू शकण्याची सोय असणार आहे. तसेच रुग्णालयात एकूण १६ आधुनिक शल्यचिकित्सागृहे देखील कार्यान्वित केली जाणार आहेत.

हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील लाखो सर्वसामान्य नागरिकांना उपचारासाठी अन्यत्र कुठेही धाव घ्यावी लागणार नाही, तर त्यांना त्यांच्याच जिल्ह्यात अत्याधुनिक व सर्वसमावेशक वैद्यकीय उपचार विनामूल्य मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे, असा विश्वासही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here