आज मराठी पत्रकार दिन. वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ हे मराठीतील सर्वात पहिले वृत्तपत्र आजच्या दिवशी सुरू केले होते. बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ दिवशी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले होते. त्यामुळं आजचा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो.
‘दर्पण’ या पहिल्या मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून देशात मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पत्रकार आहेत. ६ जानेवारी १८१२ ला कोकणात एका सामान्य घरात जन्माला आलेल्या बाळशास्त्री यांचे जीवनमान अवघ्या ३४ वर्षांचे होते. पण त्यांच्या विचारांचा ठेवा, कार्याची पद्धत आणि समाजात प्रबोधन घडवून आणण्यात मोलाचा वाटा आहे. बाळाशास्त्री जांभेकर यांचे पहिलं मराठी दैनिक ६ जानेवारीला प्रसिद्ध झाल्याने हा दिवस ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. आजच्या ‘मराठी पत्रकार दिनी’ जाणून घेऊयात त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी!
दर्पण ६ जानेवारी १८३२ ला प्रसिद्ध झाला आणि अवघ्या २० वर्षांच्या पण पंडीत असणार्या बाळशास्त्री जांभेकरांनी संपादकपदाची धुरा सांभाळली.
बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन केले. समाजातील वर्ण व्यवस्था, जातीभेद, स्त्री दास्य, सती, अस्पृश्यता, बालविवाह यांवर त्यांनी दर्पणच्या माध्यमातून लिखाण केल्याने त्यांना आद्य समाजसुधारकही म्हटलं जाऊ लागले.
बाळशास्त्रींना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन आणि ग्रीक या दहा भाषांचे ज्ञान होते. भाषांसोबतच विज्ञान, गणित, भूगोल, शरीरशास्त्र आणि सामान्य ज्ञान या विषयांचीही चांगली जाण होती.
मराठी पत्रकार दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा





















