Home नाटक / चित्रपट / मालिका / समीक्षा *मुक्या प्राण्यांना वेदनेतून मुक्ती देऊन नवीन जीवन देऊया*

*मुक्या प्राण्यांना वेदनेतून मुक्ती देऊन नवीन जीवन देऊया*

30
0

*मुक्या प्राण्यांना वेदनेतून मुक्ती देऊन नवीन जीवन देऊया*

*घाटकोपर येथे मुक्या प्राण्यांसाठी दोन दिवसीय मोफत महा-शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी महापौर श्रीमती रितू तावडे यांचे आवाहन*

*आतापर्यंत ११० आजारी व गरजू मुक्या प्राण्यांची नोंदणी; शस्त्रक्रियेसह चारा-पाणी व शुश्रूषेची संपूर्ण मोफत सोय*

*वातानुकूलित (एसी) डोममध्ये अत्याधुनिक शस्त्रक्रिया व अतिदक्षता व्यवस्था; ‘ऑक्टोबर हीट’ पासून पशू-पक्ष्यांचे रक्षण*

*शस्त्रक्रिया करून गाई-म्हशींच्या पोटातून तब्बल ४० ते ५० किलो प्लास्टिक काढल्याचे वास्तव; प्लास्टिकमध्ये अन्न टाकू नये आणि प्लास्टिकमुक्त मुंबईसाठी नागरिकांनी पुढे येण्याचे महापौरांकडून आवाहन*

आपल्या अवतीभोवती असणाऱ्या गायी, म्हशी, श्वान, इतर प्राणी, पक्षी आणि भटके मुके जीव अनेकदा दुर्धर आजार व अपघातांमुळे असह्य वेदना सहन करत असतात. ते मानवाप्रमाणे बोलून आपले दुःख सांगू शकत नसले तरी वेदना त्यांनाही तेवढ्याच तीव्रतेने होतात. या मुक्या जिवांच्या सेवेसाठी आणि त्यांना वेदनेतून मुक्ती मिळवून देण्यासाठी सर्वांनी संवेदनशीलतेने पुढे यावे, असे आवाहन मुंबईच्या महापौर श्रीमती रितू राजेश तावडे यांनी केले आहे.

राष्ट्रसंत श्री नम्रमुनी महाराज यांच्या प्रेरणेतून, बृहन्मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र शासनाचा पशुसंवर्धन विभाग आणि ‘अरहम युवा सेवा ग्रुप’ (अरहम अल्वेस केअर) यांच्या संयुक्त विद्यमाने, घाटकोपर (पूर्व) येथील आराध्य भक्ती पार्क (पोलीस हॉकी मैदान) येथे आयोजित मोफत पशु महा-शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन आज (दिनांक २१ ऑक्टोबर २०२६) सकाळी करण्यात आले. त्यावेळी महापौर श्रीमती रितू तावडे या बोलत होत्या.

याप्रसंगी शिबिराची संकल्पना मांडणारे व प्रमुख प्रेरणास्थान असलेले श्री नम्रमुनी महाराज यांच्यासह मुंबईच्या महापौर श्रीमती रितू राजेश तावडे, स्थानिक आमदार श्री. पराग शाह, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. कलीमपाशा पठाण, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या शस्त्रक्रिया व क्ष-किरण विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. गजेंद्र खांडेकर, पेट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ मुंबईचे अध्यक्ष डॉ. अनिल वडे, महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सहआयुक्त डॉ. प्रशांत कांबळे तसेच पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. एल. डी. पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

उद्घाटनानंतर महापौरांसह मान्यवरांनी संपूर्ण शिबिराची प्रत्यक्ष पाहणी करून उपचारांच्या व शस्त्रक्रियांच्या आधुनिक व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला.

या शिबिरासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे सर्वतोपरी सहकार्य पुरवण्यात आले आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा-लवंगारे व उपायुक्त (विशेष) श्री. विनायक विसपुते यांच्या निर्देशाखाली महानगरपालिकेने व्यवस्था आणि मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे.

*’ऑक्टोबर हीट’ पासून रक्षणासाठी वातानुकूलित डोम*

दिनांक २१ आणि २२ ऑक्टोबर २०२६ या दोन दिवसीय कालावधीत आयोजित या शिबिरात सध्याच्या ‘ऑक्टोबर हीट’ मुळे आजारी, अशक्त आणि शस्त्रक्रिया होणाऱ्या प्राण्यांना कोणताही त्रास होऊ नये, याची विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. यासाठी संपूर्ण सुसज्ज वातानुकूलित (एसी) डोममध्ये अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्ष (मॉड्युलर ओटी), तपासणी कक्ष, शस्त्रक्रियेनंतरची अतिदक्षता शुश्रूषा, योग्य निवारा तसेच चारा-पाण्याची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

*जटिल शस्त्रक्रिया व उपचार मोफत; आतापर्यंत ११० प्राण्यांची नोंदणी*

या शिबिरात नामांकित व तज्ज्ञ पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली शिंगांचा कर्करोग (हॉर्न कॅन्सर), हर्निया, पोटातून प्लास्टिक व इतर घटक बाहेर काढणे (रुमेनोटॉमी), डोळे व शेपटीचा कर्करोग, विविध प्रकारच्या गाठी (ट्यूमर), मोतिबिंदू तसेच हाडांच्या जटिल (ऑर्थोपेडिक) आणि इतर लहान-मोठ्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केल्या जात आहेत. शिबिराच्या पहिल्याच दिवशी सकाळपर्यंत ११० हून अधिक आजारी व गरजू पशूंची नोंदणी झाली आहे. त्यांच्यावर तज्ज्ञांच्या देखरेखीखाली शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

*गाई-म्हशींच्या पोटातून काढले ४० ते ५० किलो प्लास्टिक; ते दृश्य मन पिळवटून टाकणारे – महापौर श्रीमती रितू तावडे यांची प्रतिक्रिया*

शिबिराच्या पाहणीदरम्यान महापौर श्रीमती रितू तावडे यांनी अत्यंत विषण्णता व्यक्त करत नागरिकांना प्लास्टिकच्या वापराबाबत अंतर्मुख होण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या की, “मुक्या जनावरांना अन्न खाऊ-पिऊ घालताना नागरिक नकळत प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करतात अथवा उरलेले अन्न प्लास्टिकच्या पिशवीत बांधून रस्त्यावर टाकतात. भटक्या गाई-म्हशी भुकेपोटी ते प्लास्टिकसह खातात. आज शिबिरात शस्त्रक्रिया करताना एकेका गायीच्या पोटातून तब्बल ४० ते ५० किलो प्लास्टिकचा गोळा बाहेर पडल्याचे वास्तव समोर आले आहे. हे दृश्य पाहणेही अत्यंत वेदनादायी व मन पिळवटून टाकणारे आहे. मुक्या प्राण्यांना वाचा नसते, ते तक्रार करू शकत नाहीत; पण त्यांची योग्य काळजी घेणे हा मनुष्यप्राण्याचा धर्म आहे. मुक्या जिवांच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी मुंबई, महाराष्ट्र आणि संपूर्ण देश प्लास्टिकमुक्त करणे ही काळाची गरज आहे,” असे महापौरांनी नमूद केले.

“हे मुके प्राणी बेघर असू शकतात, परंतु जोवर आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, तोवर ते असहाय्य नाहीत,” असा विश्वास व्यक्त करत महापौरांनी नागरिकांना या शिबिराच्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

आपल्या परिसरात कोणताही आजारी, जखमी, ट्यूमर झालेला अथवा शस्त्रक्रियेची गरज असलेला पशू-पक्षी आढळल्यास नागरिकांनी तातडीने animalcamp.alwayscare.org या संकेतस्थळावर किंवा 96358 39888 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून केस नोंदवावी, जेणेकरून या मुक्या जिवांना वेळेवर उपचार मिळून एक नवीन जीवनदान लाभेल, असे महापौरांनी नमूद केले आहे.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here