Home मुंबई *नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील* *-कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा*

*नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील* *-कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा*

43
0

*नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील*
*-कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा*
• *रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ व गाव तिथे उद्योजक इनक्यूबेशन*
*कौन्सिल, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्टी अँड ॲग्रीकल्चर यांच्यासोबत सामंजस्य करार*

मुंबई, दि. २१ : ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ स्पर्धेत राज्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे, महाराष्ट्रातील तरुण नवोन्मेषक,विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील स्टार्टअप्सना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागातंर्गत रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर अंतर्गत कार्यरत असलेली गाव तिथे उद्योजक इनक्यूबेशन कौन्सिल (जीटीयूआयसी) यांच्यात सामंजस्य करार झाला. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील तळागाळातील नवकल्पनांना प्रोत्साहन देणे आणि ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ स्पर्धेच्या माध्यमातून सामाजिक समस्यांवर तंत्रज्ञान-आधारित प्रभावी उपाय शोधणे यासाठी जास्तीत जास्त स्पर्धकांचा सहभाग वाढविणे हा या कराराचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात, विशेषतः शैक्षणिक संस्था आणि ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थी व संभाव्य उद्योजकांपर्यंत पोहोचून त्यांना मार्गदर्शन आणि तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, “राज्यातील तरुणांमधील नाविन्यपूर्ण विचार आणि स्टार्टअप्सना योग्य दिशा देण्याचे काम या कराराच्या माध्यमातून होईल. ग्रामीण व निम-शहरी भागातील गुणवान तरुणांना एकत्र आणून त्यांना उद्योग जगताशी जोडणे आणि त्यांच्या कल्पकतेला व्यावसायिक रूप देण्याचे धोरण आहे. या सहकार्यामुळे महाराष्ट्रातील उद्योजकता परिसंस्थेला आणखी बळकटी मिळेल. राज्यातील महाविद्यालये, विद्यापीठे, आयटीआय आणि पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’बद्दल माहिती देणे. निवडक नवोन्मेषक व स्टार्टअप्सना तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन, तांत्रिक साहाय्य आणि योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे. युवकांना केवळ रोजगारापुरते मर्यादित न ठेवता त्यांना सक्षम उद्योजक म्हणून घडवणे. याद्वारे सामंजस्य करारामुळे राज्यातील शाश्वत विकास, नवोपक्रम आणि रोजगार निर्मितीच्या प्रवासाला अधिक वेग येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

*‘गाव तिथे उद्योजक इनक्यूबेशन कौन्सिल’च्या माध्यमातून*
*ग्रामीण उद्योजकतेला चालना देणार*
– *अध्यक्ष रविंद्र माणगावे*
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर अंतर्गत कार्यरत असलेले गाव तिथे उद्योजक इनक्यूबेशन कौन्सिलचे अध्यक्ष रविंद्र माणगावे म्हणाले की, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर अंतर्गत कार्यरत असलेली गाव तिथे उद्योजक इनक्यूबेशन कौन्सिल (जीटीयूआयसी) हा महाराष्ट्रातील ग्रामीण भागात युवांना आणि महिलांना रोजगार मागणाऱ्यांऐवजी रोजगार निर्माण करणारा हा उपक्रम आहे. ग्रामीण भागात अनेक युवक, महिला आणि स्थानिक कारागीर यांच्याकडे व्यवसाय सुरू करण्याची क्षमता व कल्पना असतात मात्र, योग्य मार्गदर्शन, भांडवल, तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि शासकीय योजनांची माहिती उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या व्यवसायवाढीला मर्यादा येतात. ही दरी भरून काढण्यासाठी गावपातळीपासून जिल्हा आणि राज्यस्तरापर्यंत संस्था काम करीत आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने जिल्हास्तरीय उद्योग विषयक मार्गदर्शन व प्रत्यक्ष रोजगार निर्मितीसाठी ही संस्था काम करत आहे, अशी संस्थेची माहिती दिली. ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’स्पर्धेसाठी जास्तीत जास्त सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा,रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगूरु डॉ.अपूर्वा पालकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर अंतर्गत कार्यरत असलेले गाव तिथे उद्योजक इनक्यूबेशन कौन्सिलचे अध्यक्ष रविंद्र माणगावे यांनी करारावर स्वाक्षरी केली. आशिष पेडणेकर, करुणाकर शेट्टी, शिवाजी मानकर, शिखर जैन, रामेश्वर पवार, सुरेश घोरपडे, अण्णासाहेब पाटील, दिवाकर केसकर, ॲड. रिचा पाठक,अक्षता भांबळे,विशाल बंडगर, जितू चव्हाण यावेळी उपस्थित होते.
000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here