*प्रा. नयना रेगे यांनी आपला पुरस्कार सद्गुरू वामनराव पै यांना केला समर्पित !
प्रतिभावंतांचा सन्मान सोहळा उच्च दर्जाचा -अभिनेते अनिल गवस यांचे गौरवोद्गार. मुंबई,
अस्मिता मराठीची गौरव कर्तृत्वाचा या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आलेल्या प्रतिभावंतांचा सन्मान सोहळा हा अत्यंत उच्च दर्जाचा असून सातत्याने हे पुरस्कार गिरगांव कट्टा चे सर्वेसर्वा श्री प्रदीप मालणकर यांनी द्यावेत आणि समाजातल्या बुद्धिवंत, प्रतिभावंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत रहावे, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते श्री अनिल गवस यांनी गौरवोद्गार काढले तसेच कृतज्ञता व्यक्त केली. जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणाऱ्या प्रा. नयना रेगे यांनी आपला पुरस्कार जीवनविद्या मिशन चे प्रणेते सद्गुरु श्री वामनराव पै यांना तर ताल तपस्वी श्री श्रीपाद राजगुरु यांनी आपला पुरस्कार गुरु पंडित सुरेश तळवलकर आणि तमाम रसिक श्रोत्यांना अर्पण केला. अस्मिता मराठीची गौरव कर्तृत्वाचा या शीर्षकाखाली गिरगांव कट्टा चे संस्थापक अध्यक्ष प्रदीप मालणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई, साहित्यिक रवि मल्ल्या, अभिनेते अनिल गवस, क्रिकेट प्रशिक्षक शेखर वराडकर, जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणाऱ्या प्रा नयना रेगे, शिवसेनेच्या मानवतावादी कार्यावर पीएचडी करणाऱ्या प्रा डॉ सरिता विजय वाकोडे, कवी विजय तारी, तबल्याच्या तालावर अनेकांना थिरकायला लावणारे ताल तपस्वी श्रीपाद राजगुरु, चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर आणि सामाजिक कार्यकर्ते नारायण पारदळे यांचा राष्ट्रपती महामहीम आदरणीय द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते नवी दिल्ली येथे संगीत अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ओडिसी नृत्य गुरू माननीय शुभदा वराडकर, प्रदीप मालणकर, स्वाती प्रदीप मालणकर, मंजिरी राजन शेटे, जान्हवी किरण गुजराथी, प्रणिता नरेंद्र कोळथरकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या सर्व प्रतिभावंतांचा परिचय ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून रंगमंचावर उभारण्यात आलेल्या पडद्यावर करुन देण्यात आला. मुंबईत फिल्मफेअर अवॉर्ड, झी गौरव, मटा सन्मान असे डोळ्यांचे पारणे फिटेल असे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. अशाच किंबहुना त्याहीपेक्षा सुंदर सोहळा हा प्रतिभावंतांचा सन्मान सोहळा असल्याचे अभिनेते अनिल गवस यांनी परखडपणे सांगितले. ओडिसी नृत्य गुरू शुभदा वराडकर यांनी आपल्याला मिळालेला सन्मान हा माझ्या माहेरचा आणि अत्यंत महत्त्वाचा आहे, असे सांगून अशा सोहळ्यांतूनच समाजातील खरे प्रतिभावंत समोर येत असतात असे स्पष्ट केले. अनेक सोहळ्याच्या प्रारंभी प्रख्यात गायिका रश्मी भूषण मुळे यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर रचित छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती गायिका आणि संपूर्ण सभागृह शिवकालीन वातावरणात भारले गेले. याच पार्श्वभूमीवर तुतारी आणि गारद यांच्या निनादात शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील अपरिचित साम्राज्याचा इतिहास सादर करुन उपस्थितांना शिवकाळात नेले. गिरगांव कट्टा चे सर्वेसर्वा प्रदीप मालणकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. दहा प्रतिभावंतांवर मंत्रोच्चारात पुष्पवृष्टी करण्यात आली. प्रख्यात गायिका संगीता मिरकर यांच्या सुमधुर आवाजातील पसायदानाने देवदुर्लभ सोहोळ्याची सांगता झाली. आहुति चे संपादक गिरीश वसंत त्रिवेदी, कार्यकारी संपादक मनीषा गिरीश त्रिवेदी, निवड समिती सदस्या भक्ती सावंत आदी मान्यवरांनाही सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार मिलिंद लिमये यांनी अत्यंत खुमासदार शैलीत सूत्रसंचालन केले. असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा दृष्ट लागण्यासारखा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.





















