‘अलबत्या गलबत्या’ने रचला इतिहास
पुण्यात सलग ७ प्रयोगांचा ‘शिखर विश्वविक्रम’
एकाच दिवशी, एकाच टीमने केली कामगिरी
अद्वैत थिएटर निर्मित, रत्नाकर मतकरी लिखित आणि चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित ‘अलबत्या-गलबत्या’ या नाटकाने शिखर विश्वविक्रम प्रस्थापित केला असून मराठी रंगभूमीच्या इतिहासात सुवर्णक्षणाची नोंद करण्याची अभिमानास्पद कामगिरी केली आहे.
“वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया “या संस्थेने “अलबत्या गलबत्या 2.O” या नाटकाच्या सलग सात प्रयोगांना शिखर विश्वविक्रम म्हणून सन्मानित केले आहे. एकाच टीमने एकाच दिवशी केलेल्या सलग ७ प्रयोगाने मानाचा शिरपेच मिळवला आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर ,अद्वैत थिएटरचे निर्माते राहुल भंडारे आणि सर्वस्य प्रोडक्शनच्या निर्मात्या श्रद्धा हांडे यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने हा महत्त्वाकांक्षी उपक्रम पुण्यात यशस्वीपणे पार पडला.
बालगंधर्व रंगमंदिरात गुरुवारी (१५ ऑक्टोबर) सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री ११ वाजेपर्यंत सलग ७ प्रयोगांचा हा विश्वविक्रम यशस्वीरित्या पार पडला.
छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून या शिखर विश्वविक्रमी प्रयोगांना सुरुवात झाली. महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँकचे प्रशासक विद्याधर अनास्कर आणि उद्यम विकास बँकेच्या उपाध्यक्ष लीनाताई अनास्कर यांच्या हस्ते या उद्घाटन झाले.
दिसवभर चाललेल्या या विश्वविक्रमी सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. पुणे शहराच्या महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, सांस्कृतिक व क्रीडा विभागाचे उपायुक्त डॉ.संतोष टेंगळे, बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलमताई शिर्के, सामाजिक कार्यकर्ते अविनाश कांबळे, सुवर्णा बाळासाहेब थिटे, संदीप विचारे, डॉ.जयंत शेवतेकर, कृष्णा आराणे हे उपस्थित होते. ५० वर्षांपूर्वी नाटकात या नाटकात भूमिका साकारणाऱ्या प्रतिभाताई मतकरी आणि त्यांच्या कन्या सुप्रिया विनोद या आवर्जून उपस्थित होत्या.
विश्वविक्रम श्रृंखलेतील अखेरचा प्रयोग रात्री ८.४५ वा सुरू झाला. तो सव्वा अकरा वाजता संपला. तेव्हा वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाच्या वतीने प्रेक्षकांसमोर या नाटकाच्या संपूर्ण टीमला सन्मानित करण्यात आले. लेखक, दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी, सर्वांच्या वतीने प्रातिनिधीकरित्या संपूर्ण टीमचे कौतुक केले. ज्या ऊर्जेने पाहिला प्रयोग सुरु केला होता. त्याच उर्जेने सलग सातही प्रयोग करुन विक्रम प्रस्थापित करणे, ही कामगिरी सर्व रंगकर्मीसाठी अभिमानास्पद आहे, असे कौतुकही त्यांनी केले.
अलबत्या गलबत्याच्या एक हजाराव्या प्रयोगाच्या निमित्ताने महापालिका शाळेतील जवळपास ६५०० विद्यार्थांना ही विनामूल्य आनंद सफर देणाऱ्या आयोजकांचे सुद्धा कौतुक आहे. आयुष्यात ज्यांनी कधीही नाटक पाहिले नव्हते, नाट्यगृहात कधी पाय ठेवला नाही. त्या मुलांना हा अविस्मरणीय आनंदी क्षण त्यांना देण्याचा विद्याधर अनास्कर यांचा मानस यशस्वीरीत्या पूर्ण झाला, असेही ते म्हणाले.विद्या बँक तर्फे मुलांना खाऊ सुद्धा दिला तसेच बँक कामकाज विषयी मुलांना माहिती व्हावी यासाठी राजू आणि पैशांचे झाड हे पुस्तक सुद्धा मुलांना भेट म्हणून देण्यात आले.
अविस्मरणीय आणि दिमाखदार अशा या शिखर विश्वविक्रमासाठी सचिन गोस्वामी, संजय नार्वेकर, विजय पाटकर, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, ,संकर्षण कऱ्हाडे ,स्पृहा जोशी ,मकरंद अनास्पुरे, नम्रता संभेराव अश्या अनेक दिग्गज कलाकारांनी शुभेच्छा दिल्या. याशिवाय, विविध संस्था, संघटना तसेच व्यक्तींनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदतीचा हात दिल्याने हा सोहळा अत्यंत यशस्वी ठरल्याचे टीम अलबत्या-गलबत्याकडून सांगण्यात आले.
चौकट
विश्वविक्रमी कामगिरीनंतर
हजाराव्या प्रयोगाची उत्सुकता
बालरंगभूमीच्या इतिहासात नवा अध्याय लिहिलेल्या या शिखर विश्वविक्रमाने संपूर्ण रंगकर्मीचे लक्ष वेधले आहे. यानिमित्ताने बालगंधर्व रंगमंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. होती. प्रवेशद्वाराजवळ रांगोळी काढण्यात आली. वातावरणनिर्मितीसाठी सनईचे सूर होते. सर्वत्र फुग्यांची सजावट होती. नाटकाची लक्षवेधी कामगिरी सांगणारी बोलकी छायाचित्रे होती. सभागृहात हजारो मुलांचा जल्लोष दिसून येत होता. प्रेक्षकांमध्ये अमाप उत्साह होता. विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
गमती जमती, हशा, टाळ्या आणि शिट्ट्यांनी नाट्यगृह दणाणून सोडणारे हे बालनाट्य केवळ मुलांचेच नव्हे, तर त्यांच्या पालकांसह ज्येष्ठ आणि थोरामोठ्यांचेही भरभरून मनोरंजन करते, हे यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले.
या नाटकात प्रमुख भूमिका साकारणारे निलेश गोपनारायण (चेटकीण),सनीभूषण मुणगेकर (अलबत्या गलबत्या )आणि श्रद्धा हांडे (राजकन्या) यांच्यासह दहा जणांचा कलाकारांचे पथक मुलांना आपल्या दमदार अभिनयाने आपलेस करतात.
विश्वविक्रमी कामगिरी पार पडल्यानंतर आता
समस्त मराठी रंगभूमीचे अलबत्या गलबत्या नाटकाच्या १००० व्या प्रयोगाकडे लक्ष लागले आहे.
०००




















