Home मुंबई *महापारेषणच्या नावाने समाजमाध्यमांवर बनावट भरती जाहिरात; कंपनीकडून स्पष्ट खुलासा*

*महापारेषणच्या नावाने समाजमाध्यमांवर बनावट भरती जाहिरात; कंपनीकडून स्पष्ट खुलासा*

35
0

*महापारेषणच्या नावाने समाजमाध्यमांवर बनावट भरती जाहिरात; कंपनीकडून स्पष्ट खुलासा*

*अधिकृत संकेतस्थळावर माहिती पडताळण्याचे आवाहन; कायदेशीर कार्यवाही सुरू*
—————–
मुंबई, दि. ९ ऑक्टोबर : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) नावाने समाजमाध्यमांवर १० विविध पदांसाठी प्रसारित होत असलेली संक्षिप्त भरती जाहिरात बनावट असून, ती कंपनीने प्रसिद्ध केलेली नाही, असा स्पष्ट खुलासा महापारेषण प्रशासनाने केला आहे. उमेदवारांनी या जाहिरातीवर विश्वास ठेवू नये आणि भरतीसंबंधी माहिती कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच पडताळावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

महापारेषणच्या नावाचा वापर करून विविध जाहिरात क्रमांक, पदे आणि रिक्त जागांची माहिती दर्शविणारी बनावट संक्षिप्त जाहिरात समाजमाध्यमांवर प्रसारित होत असल्याचे कंपनीच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीने ९ ऑक्टोबर रोजी जाहीर प्रकटन प्रसिद्ध करून उमेदवार, कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

महापारेषणच्या भरतीसंबंधी जाहिराती व अधिसूचना कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच अधिकृतरित्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केल्या जातात. त्यामुळे भरतीविषयक कोणत्याही माहितीची खातरजमा www.mahatransco.in या संकेतस्थळावर करावी. समाजमाध्यमांवरील पोस्ट, अनधिकृत संकेतस्थळे किंवा मेसेजिंग ॲप्सवरून प्रसारित होणाऱ्या माहितीवर पडताळणीशिवाय विश्वास ठेवू नये, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

या प्रकरणी महापारेषणने आवश्यक कायदेशीर कार्यवाही सुरू केली असून, तपासासाठी सक्षम सायबर गुन्हे प्राधिकरणाकडे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

उमेदवारांनी बनावट किंवा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना प्रतिसाद देऊ नये, त्या पुढे प्रसारित करू नयेत आणि त्याआधारे कोणतीही कार्यवाही करू नये. अशा अनधिकृत जाहिरातींवर विश्वास ठेवल्यामुळे होणारे आर्थिक नुकसान, फसवणूक किंवा वैयक्तिक माहितीचा गैरवापर यासाठी महापारेषण जबाबदार राहणार नाही, असेही जाहीर प्रकटनात नमूद करण्यात आले आहे.

अधिकृत माहितीची पडताळणी करूनच पुढील पाऊल उचलावे आणि बनावट भरती जाहिरातींपासून सावध राहावे, असे आवाहन महापारेषण प्रशासनाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here