Home उद्योग / शिक्षण वार्ता *वडीलांच्या कष्टांना अमरावतीच्या लेकीचा ‘सुवर्ण’ सलाम; पदार्पणातच जिंकले आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण!*

*वडीलांच्या कष्टांना अमरावतीच्या लेकीचा ‘सुवर्ण’ सलाम; पदार्पणातच जिंकले आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण!*

73
0

*वडीलांच्या कष्टांना अमरावतीच्या लेकीचा ‘सुवर्ण’ सलाम; पदार्पणातच जिंकले आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण!*

घरातील परिस्थिती अत्यंत बेताची. वडील घरीच मिठाईचे खोके बनविण्याचे काम करतात. आई गृहिणी. आपल्या मुलीने क्रीडा क्षेत्रात चांगले नाव कमवावे, हे आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने धनुष्यबाण हाती घेतला.

अत्यंत खडतर प्रवासातून तिने जपानमध्ये सुरू असलेल्या २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. ही यशोगाथा लिहिली आहे, अमरावतीच्या कुमकुम मोहोड हिने.

*पहिल्याच स्पर्धेत जिंकले सुवर्ण*

शहरातील गोसावी कॉलनीतील घरापासून आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पोडियमपर्यंत १७ वर्षीय कुमकुम अनिल मोहोडने यशाचा एकेक टप्पा पार करत आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. कुमकुम ही अमरावतीची तिरंदाजीतील पहिली आशियाई सुवर्णपदक विजेती ठरली आहे.

यावर्षी तिच्या पहिल्याच सिनियर हंगामात शांघाय आणि अंताल्या येथे सलग दोन ‘वर्ल्ड कप’ सुवर्णपदके जिंकल्यानंतर, कुमकुमने पहिल्याच आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आणि नंतर मिश्र सांघिकमध्ये रौप्यपदकाची भर घालत संस्मरणीय दुहेरी कामगिरी केली.

*सर्वसामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी*

कुमकुमची कौटुंबिक पार्श्वभूमी अत्यंत सर्वसामान्य आहे. तिचे वडील गोसावी कॉलनी येथे घरीच मिठाईचे खोके बनवण्याचे काम करतात, तर आई गृहिणी आहे.

आईच्या प्रेरणेने कुमकुमने सुमारे सहा वर्षांपूर्वी धनुष्यबाण हाती घेतले. प्रशिक्षक प्रफुल्ल डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने खेळाचे धडे गिरवले.

२०२३ मध्ये अमरावतीत ‘खेलो इंडिया’ केंद्र सुरू झाल्यानंतर तिने तेथे सराव सुरू केला. तिथे तिला प्रशिक्षक गिरीश कुकडे यांचेही मार्गदर्शन लाभले. कुमकुमचे प्रशिक्षक प्रफुल डांगे तिच्या कामगिरीवर खूश झाले आहेत.

‘तिने अंतिम सामन्यात अनुभवी तिरंदाजासारखा खेळ केला. जेव्हा गरज होती तेव्हा तिने पूर्ण अंक मिळवले आणि आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. तिने शहराचा आणि देशाचा अभिमान वाढवला आहे’, असे डांगे म्हणाले.

*घरी आनंदाचे वातावरण*

कुमकुमचे वडील अनिल मोहोड आणि आई रुपाली यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ‘इतक्या लहान वयात तिने मोठी भरारी घेतली त्याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही अत्यंत आनंदी आहोत.

तिच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले आहेत’, असे अनिल मोहोड म्हणाले. ती शहरात परतल्यावर तिच्या भव्य स्वागताची तयारी सुरू करण्यात आली आहे. ‘कुमकुम ५ ऑक्टोबरला येत आहे.

राजकमल चौकापासून डिव्हिजनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सपर्यंत मिरवणूक काढण्यात येईल. हैदराबाद येथील आर्चरी प्लेयर्स लीगसाठी रवाना होण्यापूर्वी या ठिकाणी तिचा सत्कार करण्यात येईल, असे मोहोड यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here