Home मुंबई *चंद्रपूर-गडचिरोलीतील आठ तालुक्यांचा तातडीने दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा, वडेट्टीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*

*चंद्रपूर-गडचिरोलीतील आठ तालुक्यांचा तातडीने दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा, वडेट्टीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*

42
0

*चंद्रपूर-गडचिरोलीतील आठ तालुक्यांचा तातडीने दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा, वडेट्टीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*

*पीक कर्जमाफी, धानाला हेक्टरी २० हजारांची मदत आणि मोफत बियाण्यांची मागणी, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र*

मुंबई, दि.30 : चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील ब्रम्हपुरी, जिवती, बल्लारपूर, आरमोरी, देसाईगंज (वडसा), कुरखेडा, कोरची आणि धानोरा या आठ तालुक्यांमध्ये पावसाचे अत्यल्प प्रमाण, पावसातील प्रदीर्घ खंड आणि पिकांवरील रोगांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे शेतकरी गंभीर संकटात सापडले आहेत. या आठही तालुक्यांचा तातडीने दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील या तालुक्यांमध्ये चालू वर्षात पर्जन्यमान कमी राहिले असून गेल्या महिनाभरापासून पावसाने मोठा खंड दिला आहे. परिणामी शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः धान पिकावर खोडकिडा आणि करपा रोगाचा तीव्र प्रादुर्भाव झाला असून शेतकऱ्यांच्या उत्पादनावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे.

या पार्श्वभूमीवर महसूल आणि कृषी विभागामार्फत आठही तालुक्यांतील पर्जन्यमान आणि प्रत्यक्ष पीक परिस्थितीचा तातडीने फेरआढावा घ्यावा आणि शासनाच्या निकषांनुसार या तालुक्यांचा अधिकृत दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

राज्य सरकारने आतापर्यंत 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे.मंत्र्याच्या मतदारसंघातील तालुक्यांचा यात समावेश आहे पण विरोधकांच्या या तालुक्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळेच वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली आहे. पत्रात
बाधित पिकांचे महसूल व कृषी विभागामार्फत तातडीने संयुक्त पंचनामे करावेत. रोगग्रस्त पिकांसाठी शासनामार्फत मोफत औषधे व कीटकनाशके उपलब्ध करून द्यावीत. धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २० हजार रुपये विशेष सानुग्रह मदत द्यावी.
आगामी रब्बी हंगामासाठी १०० टक्के अनुदानावर मोफत बियाणे उपलब्ध करून द्यावे. शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे केवळ पुनर्गठन न करता संपूर्ण कर्जमाफी करावी. चालू हंगामातील पीक कर्ज वाटपाची अंतिम मुदत ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढवावी. मनरेगा अंतर्गत सन २०२३-२४ मध्ये मंजूर झालेल्या सिंचन विहिरींचे प्रलंबित अनुदान तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावे.

शेतकऱ्यांवर आलेले कृषी संकट गंभीर असून केवळ कागदोपत्री पाहणी न करता प्रत्यक्ष शेतातील परिस्थितीचा आढावा घेऊन तातडीने मदतीचा निर्णय घेणे आवश्यक आहे. जनभावना आणि शेतकऱ्यांच्या अडचणींची तीव्रता लक्षात घेऊन चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील या आठ तालुक्यांना तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here