Home मुंबई *दुष्काळाची झळ मुलांच्या शिक्षणाला लागू नये; शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शासनाचा आधार द्या–...

*दुष्काळाची झळ मुलांच्या शिक्षणाला लागू नये; शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शासनाचा आधार द्या– आमदार सत्यजीत तांबे*

42
0

*दुष्काळाची झळ मुलांच्या शिक्षणाला लागू नये; शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शासनाचा आधार द्या– आमदार सत्यजीत तांबे*

*शैक्षणिक फी माफीसह वसतिगृह, परीक्षा शुल्क, पुस्तके व इतर खर्चासाठी आर्थिक सहाय्य करण्याची मागणी*

मुंबई, दि. २९ सप्टेंबर २०२६ : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक अडचणींची झळ त्यांच्या मुलांच्या शिक्षणाला लागू नये, यासाठी शासनाने विशेष शैक्षणिक मदत जाहीर करावी, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले असून, अनेक कुटुंबांसमोर दैनंदिन गरजा भागवण्याचेही आव्हान निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत महाविद्यालयीन व व्यावसायिक अभ्यासक्रमांची फी, परीक्षा शुल्क, वसतिगृहाचा खर्च, पुस्तके, प्रवास आणि इतर शैक्षणिक खर्च भागवणे अनेक विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना कठीण होत आहे. आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ येऊ नये, यासाठी शासनाने तातडीने ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचे तांबे यांनी म्हटले आहे.

दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ किंवा मोठ्या प्रमाणात कमी करावी, पात्र विद्यार्थ्यांना विशेष शैक्षणिक अनुदान द्यावे, तसेच वसतिगृह, परीक्षा शुल्क, पुस्तके व इतर शैक्षणिक खर्चासाठी स्वतंत्र आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

याशिवाय दुष्काळग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शिष्यवृत्तीची तरतूद करावी आणि शिक्षणासाठी घेतलेल्या शैक्षणिक कर्जाचा आर्थिक भार कमी करण्यासाठी विशेष सवलती व सुविधा द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे. कोणताही विद्यार्थी केवळ आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी महाविद्यालय स्तरावर विशेष विद्यार्थी सहाय्यता यंत्रणा उभारण्याचेही आमदार तांबे यांनी सुचविले आहे.

“दुष्काळ हे शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक संकट असले, तरी त्याचा परिणाम पुढच्या पिढीच्या शिक्षणावर होऊ नये. शेतकऱ्याच्या घरातील मुलाच्या हातातील पुस्तक दुष्काळामुळे हिरावले जाऊ नये,” अशी भावना व्यक्त करत शासनाने या मागणीचा संवेदनशीलतेने विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, असे आमदार सत्यजीत तांबे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here