*दुष्काळाची झळ मुलांच्या शिक्षणाला लागू नये; शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शासनाचा आधार द्या – आ. सत्यजीत तांबे*
*• शैक्षणिक फी माफीसह वसतिगृह, परीक्षा शुल्क, पुस्तके व इतर खर्चासाठी आर्थिक सहाय्य करण्याची मागणी*
*• मुख्यमंत्री फडणवीस व शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना निवेदन*
*मुंबई, दि. २९ सप्टेंबर २०२६:* राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक अडचणींची झळ त्यांच्या मुलांच्या शिक्षणाला लागू नये, यासाठी शासनाने विशेष शैक्षणिक मदत जाहीर करावी, अशी मागणी *आमदार सत्यजीत तांबे* यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
“दुष्काळ हे शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक संकट असले, तरी त्याचा परिणाम पुढच्या पिढीच्या शिक्षणावर होऊ नये. शेतकऱ्याच्या घरातील मुलाच्या हातातील पुस्तक दुष्काळामुळे हिरावले जाऊ नये,” अशी भावना तांबे यांनी व्यक्त केली.
*आमदार तांबे यांच्या ५ प्रमुख मागण्या:*
१. *फी माफ करा:* दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ किंवा मोठ्या प्रमाणात कमी करावी.
२. *संपूर्ण खर्च उचला:* वसतिगृह, परीक्षा शुल्क, पुस्तके, प्रवास व इतर शैक्षणिक खर्चासाठी स्वतंत्र आर्थिक मदत द्यावी.
३. *विशेष शिष्यवृत्ती:* दुष्काळग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शिष्यवृत्ती योजना सुरू करावी.
४. *शैक्षणिक कर्जाला सवलत:* शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचा भार कमी करण्यासाठी विशेष सवलती द्याव्यात.
५. *सहाय्यता कक्ष:* प्रत्येक महाविद्यालयात विशेष विद्यार्थी सहाय्यता यंत्रणा उभारावी, जेणेकरून कोणताही विद्यार्थी पैशांअभावी शिक्षणापासून वंचित राहणार नाही.
दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले आहे, अशा वेळी महाविद्यालयीन व व्यावसायिक अभ्यासक्रमांचा खर्च परवडत नाही, अनेकांना शिक्षण अर्धवट सोडावे लागत आहे, याकडे तांबे यांनी लक्ष वेधले.
—
*





















