*राष्ट्रीय अभियंता दिन उत्साहात; बदलत्या तंत्रज्ञानासोबत कौशल्यवृद्धीवर भर*
मुंबई, दि. १५ : देशाच्या जडणघडणीत अभियंत्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणतीही समस्या उद्भवल्यास तिच्याकडे तार्किक दृष्टिकोनातून पाहून योग्य उपाय शोधण्याची क्षमता अभियंत्यांमध्ये असली पाहिजे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) प्रभावी वापर करून अभियंत्यांनी आपले कौशल्य अधिक विकसित करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे (महापारेषण) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विक्रम कुमार (भा.प्र.से.) यांनी केले.
भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त वांद्रे येथील प्रकाशगंगा इमारतीत सोमवारी राष्ट्रीय अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विक्रम कुमार बोलत होते.
विक्रम कुमार म्हणाले, ‘‘महापारेषणचा लवकरच आयपीओ येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अभियंते, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कंपनीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सांघिक भावनेने काम करणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर दैनंदिन कामकाजात जाणीवपूर्वक केला पाहिजे. जगभरात एआयमुळे रोजगाराच्या स्वरूपात बदल होत असताना महापारेषणच्या अभियंत्यांनी एआयकडे संधी म्हणून पाहून त्याच्या मदतीने आपली कार्यक्षमता आणि कौशल्य वाढवावे.’’
*‘देशात महापारेषण प्रथम क्रमांकावर’*
‘‘पारेषण क्षेत्रात महापारेषण देशात प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्राचा हा लौकिक अधिक उंचावण्यासाठी कंपनीतील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने एकजुटीने आणि सांघिक भावनेने काम केले पाहिजे,’’ असेही विक्रम कुमार यांनी सांगितले.
सर्व अभियंते, त्यांचे कुटुंबीय आणि सेवानिवृत्त अभियंत्यांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा देऊन प्रास्ताविकात अपर जिल्हाधिकारी तथा कार्यकारी संचालक (मानव संसाधन) सुचिता भिकाने म्हणाल्या, ‘‘७४१ हून अधिक उपकेंद्रे, ५२ हजार कि.मी. हून अधिक पारेषणचे जाळे, १ लाख ३८ हजार हून अधिक एम.व्ही. ए. ट्रान्सफॉर्मेशन क्षमता, ९८ हजार हून अधिक ट्रान्समिशन टॉवर्स ही महापारेषणची क्षमता दिवसेंदिवस वाढत आहे. महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी टीम म्हणून केलेल्या कामामुळे टीबीसीबीचे चार प्रकल्प स्पर्धेतून मिळविण्यात यश आले. ऊर्जा क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. नवीकरणीय ऊर्जा, स्मार्ट ग्रिड, डिजिटल उपकेंद्रे, ड्रोन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषण आणि सायबर सुरक्षा यांमुळे अभियंत्यांच्या भूमिकेचे स्वरूप विस्तारत आहे. या बदलांशी सुसंगत राहण्यासाठी प्रत्येकाने सातत्याने नवीन ज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे.’’
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस विक्रम कुमार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अभियंता दिनानिमित्त विविध अभियंत्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रकाशगंगा परिसरात विक्रम कुमार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. विविध अभियंत्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर केलेल्या शोधनिबंधांचे सादरीकरणही यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाला संचालक (संचलन) सतीश चव्हाण, संचालक (प्रकल्प) दत्तात्रय पडळकर, संचालक (वित्त) तृप्ती मुधोळकर, कार्यकारी संचालक शशांक जेवळीकर, सुनील सूर्यवंशी, पीयूष शर्मा, मुख्य अभियंता किशोर गरूड, जुईली वाघ, महेंद्र वाळके, संदीप हाके, अमित नाईक, मुख्य महाव्यवस्थापक (माहिती व तंत्रज्ञान) नागसेन वानखेडे, उपमहाव्यवस्थापक (मानव संसाधन) नितीन कांबळे, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. राघवेंद्र पुजारी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन गौतम कांबळे यांनी केले. महाराष्ट्रातील परिमंडळातून मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता यांच्यासह सुमारे १७५ अभियंते दूरदृश्यप्रणालीव्दारे ऑनलाईन उपस्थित होते.






















