Home मुंबई *नेहरू विज्ञान केंद्र मेट्रो स्‍थानक ते वरळी प्रॉमेनेडला जोडणारा भूमिगत पादचारी मार्ग...

*नेहरू विज्ञान केंद्र मेट्रो स्‍थानक ते वरळी प्रॉमेनेडला जोडणारा भूमिगत पादचारी मार्ग प्रस्ताव मंजूर*

26
0

*नेहरू विज्ञान केंद्र मेट्रो स्‍थानक ते वरळी प्रॉमेनेडला जोडणारा भूमिगत पादचारी मार्ग प्रस्ताव मंजूर*

*मुंबईकरांच्या सोयीसाठी सुमारे १ किलोमीटर लांबीचा व ७.५ मीटर रुंदीचा मार्ग;*

*मुंबईच्‍या पर्यटनाला मिळणार मोठी चालना – स्‍थायी समिती अध्‍यक्ष प्रभाकर शिंदे*

स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा रस्ता प्रकल्पालगत प्रस्तावित असलेल्या सुमारे ३०० एकर क्षेत्रावरील लँडस्केप गार्डनला सर्वसामान्य मुंबईकर तसेच पर्यटकांना सहजपणे पोहोचता यावे, यासाठी वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्र मेट्रो स्‍थानक (मेट्रो – ३) ते वरळी प्रॉमेनेड व लँडस्केप गार्डनला जोडणारा भूमिगत पादचारी मार्ग उभारण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत बहुमताने मंजूर करण्यात आला आहे. या भूमिगत मार्गासाठी आवश्यक ७०२ कोटी ४४ लाख ३५ हजार ७ रूपये खर्च बृहन्मुंबई महानगरपालिका करणार असून, मार्गाच्या उभारणीचे काम मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमार्फत करण्यात येणार असल्‍याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिली.

स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे म्‍हणाले की, सागरी किनारा रस्ता हा मुंबईकरांसाठी स्वप्नवत आणि पथदर्शी प्रकल्प ठरला आहे. या प्रकल्पालगत सुमारे ३०० एकर क्षेत्रावर भव्य लँडस्केप गार्डन उभारण्याचे प्रस्तावित आहे. या गार्डनसोबतच नागरिकांसाठी सागरी किनारा मार्गावरील राखीव प्रॉमेनेड उपलब्ध होणार आहे. मात्र, सद्यस्थितीत या परिसरात चारचाकी वाहनाने पोहोचणे तुलनेने सोपे असले तरी सर्वसामान्य नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीच्या माध्यमातून किंवा पायी सहज पोहोचण्यासाठी सक्षम जोडणी उपलब्ध नाही. ही अडचण दूर करण्यासाठी प्रस्तावित भूमिगत पादचारी मार्ग महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

नेहरू विज्ञान केंद्र मेट्रो स्‍थानकावर उतरून महालक्ष्मी रेसकोर्स परिसरातून लाला लजपतराय रस्‍त्‍याखालून थेट वरळी प्रॉमेनेड तसेच लँडस्केप गार्डनपर्यंत नागरिकांना पायी जाता यावे, या उद्देशाने हा भूमिगत मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. अंदाजे १ किलोमीटर लांबीचा आणि ७.५ मीटर रुंदीचा हा मार्ग असल्याने मोठ्या संख्येने नागरिकांना सुरक्षित आणि सुलभपणे ये-जा करता येणार आहे. मुंबईत मेट्रोच्या वापरात सातत्याने वाढ होत असून, सर्वसामान्य मुंबईकरांसाठी मेट्रो हे परवडणारे आणि सोयीचे सार्वजनिक वाहतुकीचे साधन ठरत आहे. मेट्रो – ३ च्या माध्यमातून नागरिकांना नेहरू *विज्ञान* केंद्रापर्यंत पोहोचल्यानंतर पुढे या भूमिगत पादचारी मार्गाद्वारे थेट प्रॉमेनेड व लँडस्केप गार्डनपर्यंत जाता येणार आहे. त्यामुळे खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होऊन सार्वजनिक वाहतुकीला तसेच पादचारी सुविधांना चालना मिळेल. या भूमिगत पादचारी मार्गामुळे सागरी किनारा रस्ता परिसरातील पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे. लँडस्केप गार्डन पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील नागरिकांसह देश – विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना अत्यल्प खर्चात मेट्रोच्या माध्यमातून या परिसरात पोहोचता येईल. त्यामुळे मुंबईच्या पर्यटन सुविधांच्या दृष्टीने हा मार्ग महत्त्वाचा दुवा ठरणार आहे , असेदेखील प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.

स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे म्‍हणाले की, या कामासंदर्भात मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने जून २०२५ मध्ये भूमिगत बोगदा उभारणीचे काम करण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या संयुक्त बैठकीत मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी हे काम मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमार्फतच करण्यास मान्यता दिली. या कामासाठी आवश्यक आर्थिक भार बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून उचलण्याचेही निश्चित करण्यात आले. मेट्रोच्या जाळ्यामुळे मुंबईतील रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण आणि वाहतूक कोंडी कमी करण्यास मोठी मदत होत आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या रस्ते वाहतूक व्यवस्थेवरील ताणही कमी होत आहे. याच भूमिकेतून बृहन्मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी मेट्रो – ३ प्रकल्पासाठी सुमारे २ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आता नागरिकांच्या हिताचा हा भूमिगत पादचारी मार्ग उभारण्यासाठीही आर्थिक जबाबदारी स्वीकारण्याची तयारी महानगरपालिकेने दर्शविली आहे.

बृहन्‍मुंबई महानगरपालिका आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन या दोन्ही सार्वजनिक क्षेत्रातील संस्था असून, एका संस्थेने दुसऱ्या संस्थेमार्फत नागरिकांच्या हिताचे काम करून घेण्यात गैर काय आहे ? कंत्राटदारामार्फत काम देण्याऐवजी मेट्रो – ३च्या तांत्रिक क्षमतेचा वापर करून हे काम अधिक परिणामकारकपणे पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे काही जणांना पोटशूळ उठण्याचे कारण काय, हे अनाकलनीय आहे. कंत्राटी कामांमधील मलिद्याची सवय असलेल्या मंडळींना हा प्रस्ताव पचनी पडत नसल्याचे दिसते. मात्र, भारतीय जनता पक्षासाठी मुंबईकरांचे हित सर्वोच्च असून, नागरिकांना अत्याधुनिक, सुरक्षित आणि सुलभ पादचारी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला आहे, असा टोलादेखील स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी लगावला.

या भूमिगत पादचारी मार्गामुळे मेट्रो, सागरी किनारा रस्ता,प्रॉमेनेड आणि प्रस्तावित लँडस्केप गार्डन यांची प्रभावी जोडणी निर्माण होणार असून, भविष्यात हा मार्ग मुंबईकरांसाठी सुरक्षित, सुलभ आणि परवडणाऱ्या सार्वजनिक वाहतुकीचा महत्त्वाचा दुवा ठरणार असल्‍याचे प्रभाकर शिंदे यांनी नमूद केले आहे.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here