*दादांनी दिलेला विकासाचा वारसा अर्ध्यावर सोडून देणे हे दादांच्या शिकवणीत बसत नाही. म्हणूनच दादांनी पाहिलेले प्रगत स्वप्न आणि पुरोगामी महाराष्ट्राचे स्वप्न आपल्या सर्वांच्या साथीने पूर्ण करायचे आहे – सुनेत्रा पवार*
*मी तुमच्या डोळ्यात पहाते तेव्हा मला रडायचे नाही तर लढायचे बळ मिळते…*
*‘दादा उद्योगिनी’ आणि ‘NCP युथ स्कील’ या दोन्ही ॲपचे लोकार्पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पार…*
पुणे दि. १६ ऑगस्ट – दादांनी तुम्हाला आणि मला दिलेला हा जो विकासाचा वारसा आहे तो वारसा अर्ध्यावर सोडून देणे हे दादांच्या शिकवणीत बसत नाही. म्हणून दादांनी पाहिलेले हे प्रगत स्वप्न आणि पुरोगामी महाराष्ट्राचे स्वप्न आपल्या सर्वांच्या साथीने पूर्ण करायचे आहे. आज आपण ॲपचे उद्घाटन करत नाहीय तर एका दूरदृष्टीला पुढे घेऊन जात आहोत. त्याच दूरदृष्टीवर आदरणीय दादांचा विश्वास होता असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पुणे बालेवाडी येथे केले.
महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रेरणेतून आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ‘दादा उद्योगिनी’ आणि ‘NCP युथ स्कील’ या दोन्ही ॲपचे लोकार्पण झाले.
‘दादाज उद्योगिनी’च्या माध्यमातून महिलांना उद्योजकतेच्या क्षेत्रात पुढं जाण्यासाठी संधी आणि कौशल्याला हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन मिळणार असून, ‘NCP यूथ स्किल्स’च्या माध्यमातून युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न आहे.
आज आपल्यात आदरणीय अजितदादा नाहीत हे वास्तव आहे पण त्यांच्या जाण्याने माझ्या तुमच्या आणि संबंध महाराष्ट्राच्या मनात जी पोकळी निर्माण झाली आहे ती कुणीच कधी भरुन काढू शकत नाही. एका क्षणात आपण सगळेच पोरके झालोत पण मी तुमच्या डोळ्यात पहाते तेव्हा मला रडायचे नाही तर लढायचे बळ मिळते असा आत्मविश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आपल्या महिला भगिनींसाठी तयार करण्यात आलेल्या ‘दादाज उद्योगिनी’आणि युवकांसाठी’ ‘एनसीपी यूथ स्किल्स’ या दोन्ही ॲपचे उद्घाटन सुनेत्रा पवार यांनी आज केले.
पुण्यात हा कार्यक्रम होत आहे याचा एकादृष्टीने वेगळाच अर्थ आहे. कारण महिलांच्या शिक्षणाचा हक्क मिळावा म्हणून पहिली शाळा पुण्यात सुरू झाली आणि तरुणांच्या स्वप्नांना आकार देणारी शेकडो महाविद्यालये, उद्योग स्टार्टअप आणि सगळ्याच गोष्टी पुण्यात उभ्या आहेत. त्यामुळे आजचा दिवस नवीन सुरुवात करण्यासारखा आहे आणि एक नाविन्यपूर्ण सुरुवात आपल्या महिलांच्या आणि युवकांच्या जीवनात या अॅपने होणार आहे असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या.
दादांना अश्रू कधीच आवडत नव्हते कारण त्यांना काम आवडायचे. ते नेहमी म्हणायचे मी कामाचा माणूस आहे आणि कामाचाच माणूस आहे.आज आपण ॲपचे उद्घाटन करत नाहीय तर एका दूरदृष्टीला पुढे घेऊन जात आहोत. त्याच दूरदृष्टीवर आदरणीय दादांचा विश्वास होता हेही सुनेत्रा पवार यांनी नमूद केले.
या लोकार्पण सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे, युवक प्रदेशाध्यक्ष निखिल ठाकरे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे आदींनी आपले विचार मांडले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार पार्थदादा पवार, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे, युवक प्रदेशाध्यक्ष निखिल ठाकरे, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे,पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, युवती प्रदेशाध्यक्ष निर्मला नवले, आमदार सुनील शेळके,आमदार विक्रम काकडे, आमदार चेतन तुपे, आमदार माऊली कटके, पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विरधवल जगदाळे, प्रदेश सरचिटणीस सुरज चव्हाण, प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला, युवती, युवक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.





















