Home मुंबई पाणी अडवा, पाणी जिरवा’चा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व जिल्ह्यातील यंत्रणांनी समन्वयाने काम...

पाणी अडवा, पाणी जिरवा’चा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व जिल्ह्यातील यंत्रणांनी समन्वयाने काम करावे : मंत्री संजय राठोड २१ ऑगस्टला ‘जलसंधारण दिन’; मंत्री संजय राठोड यांचे निर्देश

40
0

पाणी अडवा, पाणी जिरवा’चा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व जिल्ह्यातील यंत्रणांनी समन्वयाने काम करावे : मंत्री संजय राठोड
२१ ऑगस्टला ‘जलसंधारण दिन’; मंत्री संजय राठोड यांचे निर्देश

मुंबई, दि. ११ : माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी जनसहभाग वाढविण्यासोबतच जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले. २१ ऑगस्ट रोजी राज्यभर ‘जलसंधारण दिन’, तर १५ ते २१ ऑगस्टदरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे.

यासंदर्भात मंत्री राठोड यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. यावेळी विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच राज्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा जलसंधारण अधिकारी सहभागी झाले होते.

माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांनी राज्यात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा संदेश देत जलसंधारणाची चळवळ उभी केली. त्यांच्या कार्याची दखल घेत २१ ऑगस्ट हा ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. माती आणि पाणी हे शेती, पर्यावरण आणि शाश्वत विकासाचे आधार असल्याने त्यांच्या संवर्धनासाठी व्यापक जनजागृती आवश्यक असल्याचे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

राज्यात ‘महा वॉकथॉन-वॉक फॉर वॉटर’

२१ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांत तीन किलोमीटरच्या ‘महा वॉकथॉन-वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात येणार आहे. ‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ ही या उपक्रमाची संकल्पना असून नागरिक, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, युवक, अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्था आणि विविध क्षेत्रातील प्रतिनिधींना सहभागी होता येणार आहे.

युवकांसाठी ‘Reel for Soil and Water Conservation’ ही राज्यस्तरीय स्पर्धाही घेण्यात येणार असून १५ ते ३० वयोगटातील युवक युवतींना यात सहभागी होता येईल. माती व पाणी संवर्धनाशी संबंधित ३० ते ६० सेकंदांची Instagram Reel तयार करणे अपेक्षित आहे.

‘जलसंधारण अभियान’ राबविणार

१५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत राज्यभर ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येणार आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धा, ‘एक शाळा-एक शोषखड्डा’, जलमित्र/जलदूत उपक्रम राबविले जाणार आहेत. २१ ऑगस्ट रोजी शाळांमध्ये स्व. सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना मृद व जलसंधारणाची शपथ दिली जाणार आहे.ग्रामीण व शहरी भागात जलस्रोतांची स्वच्छता, वृक्षारोपण, शेततळे व जलसंधारणाच्या कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण यांसारखे उपक्रमही राबविण्यात येणार आहेत.

जलसंधारण ही शासनासोबतच प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असून जलसंपन्न आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी नागरिकांनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री संजय राठोड यांनी केले.
००००००
मृद व जलसंधारण मंत्री व यवतमाळ जिल्हा पालकमंत्री संजय राठोड यांच्या जनसंपर्क कार्यालयातून प्रसिद्ध.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here