*अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूला आरोग्यमंत्री आणि संबंधित अधिकारी जबाबदार, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – विजय वडेट्टीवार*
*उपशीर्षक: निकृष्ट दर्जाच्या व्हेंटिलेटरने निष्पाप बालकांचा मृत्यू – हे व्हेंटिलेटर कोणी खरेदी करण्यास भाग पाडले? वडेट्टीवार यांचा सरकारवर घणाघाती हल्ला*
*अमरावती, दि. २६* अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागात (NICU) लागलेल्या भीषण आगीत तीन निष्पाप नवजात बालकांचा मृत्यू झाला. या घटनेची आज काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी रुग्णालयात प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेतली.
रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्थेतील गंभीर त्रुटी, कालबाह्य फायर सेफ्टी ऑडिट यामुळे सरकारच्या आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
या दुर्घटनेपूर्वीच अग्निशमन विभागाने फायर सेफ्टी ऑडिटच्या नूतनीकरणाबाबत रुग्णालय प्रशासनाला सूचना केल्याची माहिती आहे. तरीही त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. आरोग्यमंत्री केवळ चौकशीची घोषणा करून आपली जबाबदारी झटकू शकत नाहीत. या चौकशीचा अहवाल आठ दिवसात जाहीर केलाच पाहिजे, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
*वडेट्टीवार यांच्या ४ प्रमुख मागण्या:*
१. आरोग्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
२. २०२२मध्येदेखील याच रुग्णालयात शिल्लर कंपनीच्या व्हेंटिलेटरमुळे घटना – ४ वर्षे अहवाल नाही – हे व्हेंटिलेटर चायना मेड आहेत का? कोणाच्या दबावामुळे खरेदी केली? राज्यातील सर्व रुग्णालयातून हे व्हेंटिलेटर हटवा
३. मृत बालकांच्या कुटुंबाला २५ लाखांची मदत द्या – ८दिवसात अहवाल जाहीर करा
४. परिचारिकेने धाडसाने ६ बालकांचे प्राण वाचवले – तिचा सन्मान करा
आरोग्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत – हे अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा आम्ही अधिवेशनात करू, असेही वडेट्टीवार म्हणाले.
यावेळी माजी आमदार विरेंद्र जगताप, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी महापौर मिलिंद चिमोटे आदी उपस्थित होते.
*-
























