आहे रे – नाही रे मधली दरी: शेखचिल्लीच्या आभासी दुनियेतून वास्तवाकडे जाण्याची गरज!
– विशेष लेख | शीतल हरीश करदेकर MyMedia24_
मानवी संस्कृतीचा इतिहास हा प्रगतीचा इतिहास मानला जातो. चाकापासून AI आणि अंतराळ पर्यटनापर्यंत आपण आलो. पण या महामार्गावर धावताना आपण नेमके कुठे चाललो आहोत? पिढी कोणतीही असो, आज ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ मधली दरी कमी होण्याऐवजी रुंदावतेय. यासोबत चंगळवाद, निसर्गाचा ऱ्हास आणि संवेदनांचे खच्चीकरण या राक्षसांनी मुक्काम ठोकला आहे. आपण सगळेच जणू शेखचिल्लीच्या आभासी दुनियेत जगतोय, जिथे वास्तवाचे भान हरपले आहे.
आपण खूप काळ शेखचिल्लीसारखे हवेत इमले बांधत बसलो. आता त्या आभासी दुनियेतून बाहेर पडून वास्तवाकडे जाण्याची वेळ आली आहे.`
●१. इतिहासाची पुनरावृत्ती आणि वाढती दरी●
इतिहास साक्षी आहे. फ्रेंच राज्यक्रांती १७८९ आणि रशियन क्रांती १९१७ या सगळ्या ‘भूकेल्या’आणि ‘तुंबलेल्या’ वर्गातील संघर्षातूनच जन्मल्या. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातही ‘स्वराज्य म्हणजे सर्वांसाठी अन्न, पाणी, शिक्षण’ ही मागणी होती. पण आज २१ व्या शतकात Oxfam २०२४ नुसार जगातील १% लोकांकडे जगातील ४३% संपत्ती आहे. एक वर्ग मॉलमध्ये चंगळ करतोय आणि दुसरा दोन वेळच्या अन्नासाठी झगडतोय. ही आता केवळ आर्थिक नाही तर सामाजिक-मानसिक दरी आहे. इतिहास सांगतो की ही दरी दुर्लक्षिली तर ती उद्रेक घडवते.
●२. निसर्गाचा ऱ्हास: आपण सजीव संपवतोय का?●
आम्ही स्वतःला पृथ्वीचे मालक समजलो. IPCC नुसार २०१ पासून भारतातील सरासरी तापमानात ०.७°C वाढ झाली आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि चक्रीवादळे वाढली आहेत.
○अ. मुंबई ते मालवण-गोवा: किनारपट्टीचा आक्रोश○
मुंबईच्या मॅन्ग्रोव्ह कत्तलीपासून गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरील प्लास्टिकपर्यंत हीच कथा आहे. मॅन्ग्रोव्ह गेल्याने समुद्राचे नैसर्गिक कवच गेले आणि मालवणच्या प्रवाळांवर पर्यटनाचा ताण वाढला. हा ७२० किमी चा पट्टा एकाच अन्नसाखळीने बांधला आहे.
○ब. पुणे ते कोल्हापूर: नद्या आणि शेतीचा मृत्यू○
छत्रपती शिवाजी महाराजांनी नद्या आणि किल्ले जपले. आज मुळा-मुठा, कृष्णा आणि पंचगंगा या नद्या नाले झाल्या आहेत. ‘साखरपट्ट्यात’ ऊसासाठी पाणी उपसून जमीन कोरडी केली जात आहे. २०१९ आणि २०२१ मधील कोल्हापूर-सांगली पूर हे निसर्गाचा इशारा होते.
○क. विदर्भ आणि मराठवाडा: तहान आणि स्थलांतर○
इथली माती संत ज्ञानेश्वर आणि नामदेवांची आहे. पण आज गोदावरी आणि वर्धा नद्या कोरड्या पडल्या आहेत. लातूरला रेल्वेने पाणी आणण्याची वेळ आली आणि कर्जामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या. ताडोबा-मेळघाटची जंगले तोडल्याने वाघ मानवी वस्तीत येत आहेत. पाणी आणि रोजगारासाठी होणारे स्थलांतर म्हणजे गावे ओस पाडण्याची दुसरी आवृत्ती आहे.
●३. लोकसंख्या वाढ: विकासाचं अपचन●
७० च्या दशकात ‘लोकसंख्या नियंत्रण’ ही घोषणा होती. आज २०२६ मध्ये ती ‘संसाधन व्यवस्थापन’ ची गरज बनली आहे. कोणतंही अती हे अपचनच करतं.
मुंबईचं पाणी, पुण्याचे रस्ते, शाळा-हॉस्पिटल यांची एक मर्यादा आहे. लोकसंख्या वाढली की तीच पायाभूत सुविधा अपुरी पडते. एका वर्गात ८० मुले असतील तर गुणवत्ता कशी येणार? एकाच नळाला १० घरे जोडली तर पाणी कसे पुरणार? अधिक माणसे म्हणजे अधिक घरे, अधिक गाड्या, अधिक कचरा, अधिक वीज. त्यासाठी जंगलं तोडली जातात आणि नद्या अडवल्या जातात. नोकऱ्या, जमीन, पाणी, शिक्षण या सगळ्या मर्यादित आहेत. पण मागणी वाढतच आहे. त्यामुळे स्पर्धा वाढली आणि ‘आहे रे-नाही रे’ दरी रुंदावली. आपण “विकास’ केला पण ‘समतोल’ विसरलो.
●४. चंगळवाद आणि माहितीचे अतिक्रमण: हे दुहेरी संकट●
पुर्वी ‘संतोषात जीवन’हा मंत्र होता. आता ‘गरज म्हणून नाही तर स्टेटस म्हणून खरेदी’ केली जाते. त्यात भर म्हणजे Information Overload आहे. सोशल मीडियाचा दर सेकंदाला भडिमार होतो आणि त्यामुळे खरं-खोटं ओळखता येत नाही. मेंदू थकला आहे आणि स्वतंत्र विचार संपला आहे. आपण माहितीचे गुलाम झालो आहोत , हे मानून अतिवर मर्यादा घालण अतिशय आवश्यक बनलं आहे.
●५. राजकीय अभ्यासूपणा आणि दूरदृष्टीचा अभाव:● धोरणांचा अपघात●
सगळ्यात मोठा शेखचिल्लीपणा इथेच आहे. आपण समस्या ओळखतो पण सोडवताना केवळ ‘तात्पुरता मलमपट्टी’ करतो. झाडं लावली जातात ती फोटो काढण्यासाठी, जगवण्यासाठी नाहीत. नदी स्वच्छतेच्या घोषणा होतात पण कारखान्यांवर कारवाई होत नाही. पूर आला की मदत दिली जाते पण पूर का येतोय याचा अभ्यास होत नाही. रस्ता रुंद झाला आणि इमारत उंच झाली म्हणजे विकास मानला जातो. पण पाणी, हवा, जंगल आणि माणुसकी याचा GDP मध्ये हिशोबच केला जात नाही. पर्यावरणतज्ज्ञ आणि शेतकरी वर्षानुवर्षे इशारे देतात पण धोरण ठरवताना त्यांना विचारात घेतले जात नाही. दूरदृष्टी म्हणजे पुढच्या पिढीचा विचार करण गरजेचं पण आज आपण फक्त पुढच्या निवडणुकीचा विचार करतोय.
●६. संवेदनाशीलता आणि माणुसकीचा ऱ्हास:● खच्चीकरण समाजाचे●
तंत्रज्ञानाने आपण जोडलो गेलो पण मनाने दुरावलो. अपघातग्रस्त रक्ताच्या थारोळ्यात आपण व्हिडिओ काढतोय आणि त्याला ‘लाईक्स’ साठी वापरतोय. ज्यांनी रक्ताचे पाणी केले त्यांनाच आपण वृद्धाश्रमात पाठवतोय. मृत्यूवरही सोशल मीडियावर खालच्या पातळीच्या कमेंट्स केल्या जात आहेत. फ्लॅट संस्कृतीमुळे शेजारी मेला तरी कळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
●७. शेखचिल्लीचे जगणे सोडण्याची वेळ!●
‘घडा फुटेल, दूध सांडेल’ अशी आपली अवस्था झाली आहे. आपण कर्ज काढून वस्तू घेतो, पाणी वाया घालवतो आणि ‘निसर्ग नंतर बघू’ असे म्हणतो. अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि माणुसकी हे एकाच कापडाचे धागे आहेत. एक तुटला की सगळं फाटेल. छत्रपती शिवरायांनी सांगितलं होतं की ‘निसर्ग आणि प्रजा जपली की राज्य टिकतं.’
●८. बदल काय आवश्यक आहेत?●
वैयक्तिक पातळीवर Minimalism अंगीकारणे आवश्यक आहे. गरजा मर्यादित ठेवा, पाण्याचा ताळेबंद ठेवा, ओला-सुका कचरा वेगळा करा आणि प्लास्टिक बंद करा. Digital Detox करा म्हणजे स्क्रीन कमी करा आणि माणसांशी संवाद वाढवा. सामाजिक आणि शासकीय पातळीवर वृक्षसंगोपन करणे गरजेचे आहे. फक्त झाडे लावून चालणार नाही तर ती जगवावी लागतील. Rain Water Harvesting बंधनकारक करा, नद्यांचे पुनरुज्जीवन करा आणि Solar-EV ला प्रोत्साहन द्या. शाळेत करिअर सोबत भावनिक साक्षरता शिकवा. ‘नाही रे’ वर्गासाठी शिक्षण आणि रोजगाराच्या समान संधी निर्माण करा. संसाधन आणि गरज यांचा समतोल साधणे ही काळाची गरज आहे.
●निष्कर्ष●
वेळ अजून गेलेली नाही. मुंबई ते गोवा, पुणे ते कोल्हापूर आणि विदर्भ ते मराठवाडा संपूर्ण महाराष्ट्र एकाच साखळीत आहे. शेखचिल्लीसारखे हवेत इमले बांधणे थांबवून आपण जमिनीवर यायला हवे. MyMedia24 च्या माध्यमातून आपण संकल्प करूया की बदलाची सुरुवात स्वतःपासून करायची आहे.
दरी बुजवायची असेल तर आधी डोळे उघडावे लागतील. शेखचिल्लीचे जगणे सोडून वास्तवाला सामोरे जावे लागेल. तेव्हाच ‘आहे रे’आणि ‘नाही रे’ ऐवजी फक्त ‘आपण’ उरू.`
#आहेरेनाहीरे #शेखचिल्ली #MyMedia24 #महाराष्ट्र #पर्यावरण #समतोलविकास
—






















