मुंबईतील ‘सब भूमी अदानी’ की, बेस्ट बसच्या डेपोची १४० एकर जागाही अदानीच्या घशात, मुंबईचे नाव बदलून अदानीनगरच करा.
मुंबई, दि. ५ ऑगस्ट..
मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीवर हात साफ करण्याचे उद्योग भाजपा महायुती करत आहे. नगरसेवकांसाठी अलिशान कार खरेदी करण्याचा प्रताप उघड झालेला असताना आता महापौरांच्या बंगल्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्याचा घाट घातला आहे. चार महिन्यापूर्वीच २.४ कोटींचा खर्च करण्यात आल्यानंतर पुन्हा अलीशान सुविधांसाठी २.९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. हा मुंबईकरांच्या कष्टाचा पैसा आहे, तो मुंबईकरांच्या सुविधांवर खर्च करा, मुंबईकरांच्या पैशावर मौजमस्ती करण्याचे उद्योग थांबवा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
यासंर्भात बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबईकर खड्ड्यांतून वाट काढत आहेत, आरोग्य सेवा कोलमडली आहे, रुग्णालये वेंटीलेटरवर आहेत, रुग्णालयात वैद्यकीय स्टाफ नाही, औषधे नाहीत, शाळांना निधी नाही, थोड्याशा पावसाने मुंबईत जागोजागी पाणी तुंबते, बेस्ट सेवाचा बोजवारा उडाला आहे. मुंबईकरांना सुविधा देण्याऐवजी नगरसेवकांना आलिशान महागड्या कार हव्या आहेत, महापौरांच्या बंगल्यावर कोट्यवधींची उधळपट्टी सुरू आहे. मुंबईकरांच्या पैशाची अशा प्रकारे उधळपट्टी करण्यासाठी सत्ता दिलेली नाही. मुंबईकरांच्या घामाच्या पैशातून सत्ताधाऱ्यांचा राजेशाही थाट उभा राहत आहे. नगरसेवक, महापौरांसाठी पैसे खर्च केले जात आहेत पण मुंबईकरांच्या मूलभूत सुविधांवर खर्च करताना मात्र हात आखडता घेतला जातो, काँग्रेस पक्ष व मुंबईकर हे खपवून घेणार नाही.
बेस्ट डेपोची १४० एकर जमीनही अदानीला भेट..
भाजपा महायुती सरकार सर्वसामान्य जनतेसाठी नाहीतर अदानी अंबानीसाठीच काम करत आहे याचा पुन्हा प्रत्यय आला आहे. देशभरातील संपत्ती अदानीला आंदण देण्याचा सपाटा सुरुच असून मुंबईतील मोक्याच्या जागाही दिल्या जात आहेतच. आता बेस्टच्या २२ डेपोंची १४० एकर जमीनही अदानीला देण्यात आली आहे. बेस्टचा कायापालट करण्याच्या नावाखाली भाजपा महायुतीने बेस्टची जमीन अदानीला देऊन टाकली आहे. मुंबईकरांच्या दुसऱ्या जीवनवाहिनीचे खाजगीकरण करण्याची ही सुरुवात असून जागा विकल्यानंतर आता बेस्ट बसची सेवाही खाजगी कंपनीच्या हाती दिली जाईल. आत्ताच सीटीफ्लो सारख्या हजारो बसेसना मुंबईचे रस्ते मोकळे करून दिले आहेत. बेस्टचे खाजगीकरण करून हजारो कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावण्याचा भाजपा महायुतीचा हा डाव आहे पण बेस्टच्या खाजगीकरणास काँग्रेसचा विरोध कायम आहे, असेही खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.



















