*बोडका डोंगर हिरवाईने बहरला ! १४ वर्षांत ३,२०० हून अधिक वृक्षांची लागवड -वैशाली सुधीर थोरवे, नवी मुंबई.*
“एक वृक्ष म्हणजे भविष्यातील अनेक पिढ्यांना दिलेली जीवनाची अमूल्य भेट,” या विचाराने प्रेरित होऊन नवी मुंबईतील पर्यावरणप्रेमी सुधीर थोरवे, त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि सहकारी गेली १४ वर्षे सातत्याने पर्यावरण संवर्धनाचे कार्य करत आहेत. वन विभागाच्या सहकार्याने विविध ठिकाणी आतापर्यंत ३,२०० हून अधिक वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन केले आहे. मागील सहा वर्षे कर्जत येथे त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे एकेकाळी ओसाड आणि बोडका असलेला डोंगर आज हिरवाईने नटू लागला आहे.
याच उपक्रमाचा भाग म्हणून यंदाही कर्जत तालुक्यातील वांजळे वनपरिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. वयाच्या ०४ ते ७८ वर्षांतील सुमारे ९० निसर्गप्रेमींनी एकत्र येऊन जवळपास २५० वृक्षांची लागवड केली. प्रवीण देशपांडे व गणेश कुरगुडे यांनी खड्डे खोदण्याची मशीन आणल्यामुळे खड्डे खोदण्याचे काम अधिक सुखकर झाले. असे असले तरी काही उत्सुक मंडळींनी कुदळ, फावडी आणि टिकाव हातात घेऊन मनापासून श्रमदान केले. हिरवागार परिसर, डोंगररांगा, धबधबे आणि रिमझिम पावसाच्या साक्षीने पार पडलेल्या या उपक्रमाने पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संदेश दिला.
या उपक्रमासाठी वनाधिकारी निलेश भुजबळ, जितेंद्र चव्हाण तसेच त्यांचे सहकारी व कर्जत येथील शरद पवार, आप्पा भोईर व यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
वृक्षारोपणानंतर सहभागी सदस्यांनी शेजारी वाहणाऱ्या नदीत डुंबण्याचा आनंद घेतला. त्यानंतर झालेल्या वनभोजनावेळी सुधीर थोरवे, लक्ष्मीकांत आणि दिलीप काळन मित्रमंडळींनी सादर केलेल्या गीतांनी वातावरणात आणखी रंगत आणली.
वनभोजनाची उत्कृष्ट व्यवस्था वैशाली थोरवे, राणी थोरवे, रूपाली आणि ज्योती काशीद यांनी सांभाळली.
या प्लांटेशन ग्रुपच्या प्रमुख शिलेदारांमध्ये वृक्ष मित्र मारुती कदम, सागर म्हात्रे, डॉ. राजू थोरवे, जाग्रुती राव, हितेश भट, चेतन जलाल, राजेंद्र पटेल कुटुंबीय, माधुरी प्रभूळकर, मनीषा करणे कुटुंबीय, जे पी लबडे, नंदकुमार पावशे, सर्वेश बेनकर, जेमीन शहा व लक्ष्मी शुक्ला कुटुंबीय, भरत मधु, योगेश कसखेडीकर, प्रसन्ना संगवार, अमित देशपांडे, रवी व प्रवीण गवळी कुटुंबीय, हेरंब प्रधान, जिया तेजूजा, पुष्पा चांदवडकर, निलेश बाबर, अजित कोपर्डे, संदीप वाणी, श्याम महामुनी, महेश आठले, अनिल चाळके, आशुतोष डबली आणि किरण भावे कुटुंबीय व सुजाता राऊत यांच्या श्रमदानाने कार्यक्रम उत्साहात पार पडला
वृक्षारोपण हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून ती पुढील अनेक वर्षांची जबाबदारी आहे. आपण लावलेला प्रत्येक वृक्ष भविष्यातील पिढ्यांना शुद्ध हवा, पाणी आणि समृद्ध पर्यावरण देणार आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने दरवर्षी किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा. लोकसहभागातूनच हरित महाराष्ट्राचे स्वप्न साकार होईल.”
कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी झालेल्या सर्वांनी येत्या वर्षी आणखी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचा निर्धार व्यक्त केला. पर्यावरण संवर्धनासाठी समाजातील प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
*-वैशाली सुधीर थोरवे ९९६७६४१११६. vaishalithorwe@gmail.com*















