Home नागपूर *कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक* *नमो शेतकरी महासन्मान निधीला कात्री का,काँग्रेस विधिमंडळ नेते...

*कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक* *नमो शेतकरी महासन्मान निधीला कात्री का,काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल*

7
0

*कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक*
*नमो शेतकरी महासन्मान निधीला कात्री का,काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल*

*ओबीसींच्या विविध प्रश्नासाठी ३ ऑगस्ट पासून पूर्व विदर्भात मंडल यात्रा , वडेट्टीवार यांची माहिती*

नागपूर, दि. ३१ : राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मोठा गाजावाजा केला असला, तरी प्रत्यक्षात लाखो शेतकऱ्यांना विविध अटी-शर्तींच्या जाळ्यात अडकवून योजनांपासून वंचित ठेवण्याचे काम केले आहे. आता कर्जमाफीचा आधार देत ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेलाच कात्री लावण्याचा निर्णय घेतला जात असल्याने सरकारची शेतकरीविरोधी भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे, अशी टीका विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

वडेट्टीवार म्हणाले की, महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतून आधीच लाखो शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली. आता ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जात आहे, त्यांनाच ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. एका हाताने मदत दिल्याचा गाजावाजा करायचा आणि दुसऱ्या हाताने शेतकऱ्यांच्या हक्काची आर्थिक मदत काढून घ्यायची, ही सरकारची फसवणुकीची नीती असल्याचा आरोप त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, सरकारकडे शेतकऱ्यांसाठी पुरेसा निधी नसल्याचे सांगितले जाते,मात्र योजनांच्या जाहिरातींसाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जाते. कर्जमुक्ती योजनेच्या प्रसिद्धीसाठी तब्बल १० कोटी रुपये खर्च करण्यात आले, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात अपेक्षित मदत पोहोचत नाही.

ओबीसी समाजाच्या स्वतंत्र जनगणनेची मागणी करताना वडेट्टीवार म्हणाले की, लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसींना निधी, वसतिगृहे आणि सुविधा दिल्या जात नाहीत.वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केलं जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकमध्ये ओबीसी आरक्षणाबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे ३ ऑगस्टपासून पूर्व विदर्भात ओबीसी हक्कांसाठी ‘मंडल यात्रा’ काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

चंद्रपूर जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पाच्या घोडाझरी कालव्याला पाणी सोडल्याच्या पहिल्याच दिवशी मोठे भगदाड पडले आहे. ससे आणि उंदरांनी केलेल्या बिळांमुळे कालव्याची भिंत कमकुवत झाली,पाण्याचा दाब सहन न झाल्याने कालवा फुटल्याचा अजब अहवाल सिंचन विभागाने दिला आहे. यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई केली पाहिजे. निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना राजकीय संरक्षण मिळत असल्याचा आरोप ही वडेट्टीवार यांनी यावेळी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here