ज्येष्ठ पत्रकार, संपादक नागपूरसह अन्य तरुण भारतची जबाबदारी पार पाडणारे लक्ष्मणराव जोशी यांचे निधन.
तरुण भारत आणि लक्ष्मणराव असे समीकरण होते. आपण पत्रकार, संपादक असलो तरी संघ विचाराच्या दैनिकाचे आहोत याचे भान ठेवून त्यांनी काम केले. आक्रमकतेऐवजी संयम जोपसला. आपल्यातील स्वयंसेवक जागा ठेवून तरुण भारतचे संपादक म्हणून नेतृत्व केले. विचारवंत म्हणून ओळख स्थापित करण्याऐवजी विवेकी संपादक म्हणून ते परिचित होते. बुद्धिजीवी असे ब्रॅण्डिंग नाकारून कार्यकर्ता पत्रकार म्हणून रहाण्यात समाधान मानले.
नागपूरसह जळगाव, मुंबई आणि गोवा येथे ते कार्यरत होते. सहकाऱ्यांवर आपले संपादकत्व लादले नाही. दैनिकाचे काम हे समूह कार्य मानून त्यांनी केले.
साप्ताहिक विवेक आणि मुंबई तरुण भारतच्या कामानिमित्त लक्ष्मणराव यांची ओळख झाली. त्यातून मैत्री झाली. लक्ष्मणराव यांच्याशी सहजपणे गप्पा होत. माझ्या लिखाणावर ते प्रतिक्रिया देत असत. ठाण्यात बाळकूम येथे त्यांची मुलगी रहाते. ठाण्यात आल्यावर ते कळवत. मग ठरवून भेटणे आणि गप्पा होत असत.
संघ विचाराच्या दैनिकासह सर्वच माध्यमांच्या मर्यादा आहेत. त्याचे एक बलस्थान आहे. दोन्ही समजून काम केले पाहिजे. अन्य माध्यमांशी तुलना करून आपण तसे होण्याने विस्तार होणार नाही ; असे त्यांचे सांगणे होते.
लक्ष्मणराव फेसबुकवर त्यांचे वय लक्षात चांगल्याप्रकारे सक्रिय होते.
आमच्या एका पत्रकार गटावर लक्ष्मणराव यांच्या जाण्याची बातमी आली. ज्येष्ठ पत्रकार, मित्र सुनील कुहीकर यांना फोन करून बातमीची खात्री करून घेतली.
रा. स्व. संघ आपल्या शताब्दी वर्षात आहे. संघ विचारांच्या माध्यमांची तुलनेत सद्यस्थिती बरी आहे. ज्यांना त्या प्रतिकूलतेची माहिती असण्याचे कारण नाही ते आज अनुकूलतेत काम करत आहेत. लक्ष्मणराव यांनी प्रतिकुलता अनुभवली आणि अनुकूलतेकडे झालेला प्रवास पाहिला.
राज्यातील सामाजिक, राजकीय बदल टिपून तो आपल्या लेखणी मांडणारे लक्ष्मणराव जोशी गेले. तरुण भारतच्या वाटचालीतील एक स्तंभ कायमचा विसावला आहे.
शिकवणाऱ्या, सांगणाऱ्या, सल्ला देणाऱ्या लक्ष्मणराव यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

















