Home पुणे *दिवंगत अजितदादा पवार यांच्या कार्याची उणीव कायम जाणवेल; महायुती विकासाचा वारसा पुढे...

*दिवंगत अजितदादा पवार यांच्या कार्याची उणीव कायम जाणवेल; महायुती विकासाचा वारसा पुढे नेईल : डॉ. नीलम गोऱ्हे*

28
0

पुणे.दि.२२ जुलै : दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त पुण्यातील शिवसेनेच्या बाळासाहेब भवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या नेतृत्वाची उणीव आजही प्रकर्षाने जाणवत असल्याचे सांगितले.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथ शिंदे यांनीही आज लेखाच्या माध्यमातून अजितदादा पवार यांना आदरांजली वाहिली असून विविध स्तरांवर त्यांना अभिवादन करण्यात आले आहे. पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने अजितदादा पवार यांचे योगदान मोठे होते. दर आठवड्याला नियमित बैठका घेऊन विविध विकासकामांचा ते बारकाईने आढावा घेत असत. त्यांच्या पश्चात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जबाबदारी सांभाळत असल्या, तरी अनेक विषयांवर अष्टपैलू पद्धतीने लक्ष ठेवण्याची त्यांची कार्यशैली वेगळी होती.”

राजकारणातील त्यांच्या दीर्घ अनुभवामुळे प्रशासनावर आणि लोकप्रतिनिधींवर त्यांचा प्रभाव होता, असे नमूद करत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, महायुतीच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिन्ही नेत्यांनी राज्याच्या राजकारणाला नवी दिशा दिली. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसारखे महत्त्वाचे निर्णय त्यांच्या आयुष्यात झाले असते, तर त्यांना त्याचा निश्चितच आनंद झाला असता.

२००२ पासून विविध राजकीय भूमिकांमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अजितदादा पवार यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याचे सांगताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष अशा कोणत्याही भूमिकेत असलो, तरी गेली २४ वर्षे त्यांच्यासोबत काम करताना त्यांच्या कार्यपद्धतीचा जवळून अनुभव घेतला. त्यामुळे त्यांची उणीव वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातही जाणवते.”

महायुतीच्या माध्यमातून राज्यातील विकासकामांचा वेग कायम राहील, असा विश्वास व्यक्त करत डॉ.गोऱ्हे यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांबाबत केंद्र सरकार सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

याप्रसंगी, शिवसेनेचे पदाधिकारी सुधीर कुरुमकर, संदीप शिंदे, हिरामण धनकवडे, महेंद्र जोशी, एकनाथ ढोले, पूजा रावेतकर, अंजली दिघे व पूनम पाटील यांसह शिवसैनिक उपस्थित होते.
——

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here