Home मुंबई *वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे महाराष्ट्राची देशभर बदनामी, काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांची टीका*

*वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे महाराष्ट्राची देशभर बदनामी, काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांची टीका*

32
0

*विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा वडेट्टीवार यांची मागणी*

*या प्रकरणी सरकारकडून ठोस उत्तर न आल्याने विरोधकांनी केला सभात्याग*

मुंबई, दि. २९ : महाराष्ट्रात NEET, TET यांसारख्या महत्त्वाच्या परीक्षांमध्ये वारंवार पेपरफुटीच्या घटना घडत असल्याने राज्याची देशभर बदनामी होत असून लाखो विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

विधान सभेचे आजचे कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांनी स्थगन मांडण्याची विनंती केली. त्यावेळी ते म्हणाले की, लाखो विद्यार्थी आणि शिक्षक वर्षानुवर्षे मेहनत घेऊन परीक्षेची तयारी करतात. मात्र, पेपरफुटीच्या घटनांमुळे त्यांच्या कष्टांवर पाणी फिरत आहे. परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेण्यात सरकार वारंवार अपयशी का ठरत आहे, याचे उत्तर सरकारने महाराष्ट्राला द्यावे.

वडेट्टीवार यांनी TET पेपरफुटी प्रकरणातील धागेदोरे, पेपर तयार करणाऱ्या संस्था, संबंधित कंपन्या आणि या प्रकरणामागील संपूर्ण साखळीची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. तीन आरोपींना अटक झाली असली तरी त्यांचे दुसऱ्या राज्यांशी असलेले संबंधही समोर येत आहेत. त्यामुळे या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

२०१८ मधील TET घोटाळ्यातील आरोपी अभिषेक सावरीकर याचा उल्लेख करत वडेट्टीवार म्हणाले की, घोटाळ्यात आरोपी असलेल्या व्यक्तींना नंतर भाजप पक्षात सन्मानाने प्रवेश मिळाला. क्रिस्टलचे नाव कुठून येत आहे? सरकारच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून हे सरकारपुरस्कृत घोटाळे आहेत का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

राज्यातील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून या गंभीर विषयावर विधिमंडळात सविस्तर चर्चा व्हावी. सरकारने दोषींवर कठोर कारवाई करण्याबरोबरच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणती ठोस पावले उचलणार आहे,आरोपींवर कठोर कारवाई करण्याची अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केली.

याप्रकरणी सरकारने ठोस उत्तर न दिल्यानं तसेच विरोधकांना भूमिकांदु न दिल्याने महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here