Home मुंबई *नोंदणीकृत फेरीवाल्यांना क्यू आर कोड आधारित ओळखपत्र प्रदान करण्याचा महापौर श्रीमती रितू...

*नोंदणीकृत फेरीवाल्यांना क्यू आर कोड आधारित ओळखपत्र प्रदान करण्याचा महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या हस्ते शुभारंभ*

53
0

मूळ मुंबईतील आणि अधिकृतपणे व्यवसाय करणाऱया फेरीवाल्यांना स्थापित करणे आणि अनधिकृत फेरीवाल्यांना हटवणे, यासाठी वर्षोनुवर्षे प्रलंबित असणारे प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेले प्रयत्न आता यशस्वी होत आहेत. याचाच एक भाग म्हणून नोंदणीकृत फेरीवाल्यांना क्यू आर कोड आधारित ओळखपत्र प्रदान करण्याचा प्रातिनिधिक शुभारंभ आज होत आहे, असे उद्गार मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी काढले.

माननीय न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आणि नगर पथविक्रेता अधिनियम आधारे एकूण नोंदणीकृत ९९,४३५ नगर पथविक्रेता (फेरीवाले) यांना क्यू आर कोड आधारित ओळखपत्र वितरित करण्याच्या कार्यवाहीचा प्रातिनिधिक शुभारंभ मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या हस्ते आज (दिनांक २५ जून २०२६) करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या.

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात आयोजित या शुभारंभ प्रसंगी सभागृह नेते श्री. गणेश खणकर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्री. प्रभाकर शिंदे, शिवसेना गटनेते श्री. अमेय घोले, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे गटनेते श्री. अशरफ आझमी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना गटनेते श्री. यशवंत किल्लेदार, सुधार समितीच्या अध्यक्ष श्रीमती संध्या दोशी, शिक्षण समितीच्या अध्यक्ष श्रीमती राजेश्री शिरवडकर, नगरसेविका श्रीमती दीपमाला बढे, नगरसेविका श्रीमती प्रीती सातम, नगरसेविका श्रीमती शीतल गंभीर, नगरसेविका डॉ. (श्रीमती) सईदा खान, नगरसेवक श्री. रमाकांत रहाटे, नगरसेवक श्री. तेजिंदर सिंग तिवाना, नगरसेवक श्री. शिवकुमार झा, अनुज्ञापन अधीक्षक श्री. अनिल काटे आदी यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरुपात मुंबईतील विविध भागातील मिळून सुमारे १०० नोंदणीकृत नगर पथविक्रेता (फेरीवाले) यांना महापौर श्रीमती रितू तावडे यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते क्यू आर कोड आधारित ओळखपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी संबोधित करताना महापौर श्रीमती रितू तावडे म्हणाल्या की, महापौर म्हणून मी पदभार स्वीकारल्यानंतर फेरीवाल्यांबाबतचा प्रश्न सोडविण्यासाठी महानगरपालिकेतील फेरीवाला धोरणाची सर्व माहिती व सद्यस्थिती जाणून घेतली. या विषयातील अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.

नगर पथविक्रेता अर्थात फेरीवाला समितीची ऑगस्ट २०२४ मध्ये निवडणूक झाली तरी न्यायप्रविष्ट कारणांमुळे मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी माननीय न्यायालयाने परवानगी द्यावी, या संदर्भात प्रयत्न करण्यासाठी विधी खात्याला निर्देश दिले. माननीय न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होऊन नगर पथविक्रेता समित्यांचा प्रश्न मार्गी लागला.

माननीय न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आणि ठरवून दिलेल्या मुदतीत नगर पथविक्रेता अधिनियम आधारे एकूण ९९,४३५ फेरीवाल्यांना क्यू आर कोड आधारित ओळखपत्र वितरित करण्यात येत आहेत. फेरीवाल्यांशी संबंधित विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी यापुढेही सातत्याने प्रयत्न करणार आहे. कोणावरही अन्याय होऊ नये आणि पात्र असलेल्यांपैकी कोणीही लाभापासून वंचित राहू नये, यादृष्टीने आपण सर्वसमावेशक प्रयत्न यापुढेही करणार आहोत, असे महापौरांनी नमूद केले.
***
(जसंवि/२२६)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here