*अग्रलेख:
सरकार कुणाचं? पक्षाचं की महाराष्ट्राचं?*
*उपशीर्षक: निधी भेद नाही, ED-CBI चा दबाव हा खरा ‘डाका’ आहे*
*विकास हा कोणत्या पक्षाच्या दावणीला बांधलेला नाही. तो जनतेच्या घामाचा, करदात्याच्या पैशाचा आणि घटनेने दिलेल्या हक्काचा विषय आहे.*
*मूळ प्रश्न असा आहे – सरकार फक्त सत्ताधारी सरकार व त्यांच्या लोकप्रतिनिधी व तिथल्या लोकांचे असते का?*
*आणि हा अन्याय कोणत्या महाराष्ट्रासोबत होतोय? जो महाराष्ट्र ‘देणारा’ आहे.*
*महाराष्ट्र दरवर्षी केंद्राला कराच्या रूपात 6 लाख कोटींपेक्षा जास्त वाटा देतो.* म्हणजे आमच्या खिशातला कर थेट दिल्लीला जातो.
*मग जेव्हा त्याच महाराष्ट्राला त्याच्या हक्काचा निधी देताना ‘पक्ष बघून’ भेदभाव होतो, तेव्हा ‘कर घेताना आम्ही भारतीय, पण निधी देताना आम्ही विरोधी?’ ही कोणती लबाडी?*
*वरून गळे काढायचे – ‘आम्ही आम्ही आम्हीच करतोय. निधीची नाही कमी, कामाची हमी’.*
*अरे पण हा निधीचा पैसा लोकांचा आहे! तुमच्या पक्षाच्या तिजोरीतला नाही.*
*लक्षात ठेवा – की आपण मालक नाही, पालक आहोत.* लोकांचा पैसा उचित पणे वापरण्याचा अधिकार निवडून सरकारात बसलात म्हणून आहे, मालक म्हणून मिरवण्याचा नाही.
*लोकांचा पैसा लोकांसाठीच वापरायचा असतो, ‘आम्ही’ म्हणून स्वतःची पाठ थोपटण्यासाठी नाही.*
*पण थांबा – हा ‘निधी भेद’ फक्त वरचं कारण आहे. खरा खेळ तर पडद्यामागे चालतो.*
*यांची ‘मोडस ऑपरेन्डी’ ठरलेली आहे: आधी दारात ED पाठवायची, मग CBI, IT अशा इतर चौकशा लावायच्या, आणि शेवटी ‘जेलात टाकण्याची धमकी’ द्यायची.*
*रात्री २ वाजता धाडी, सकाळी ६ वाजता समन्स, आणि दुपारी १२ वाजता ‘पक्षप्रवेश’.*
*हा ‘विकास’ नाही – हा ‘दबावतंत्राचा धंदा’ आहे.*
*’निधी देत नाही’ असं सांगून विरोधकांना नामोहरम करायचं, आणि मग ‘केसेस मागे घेण्याचं आमिष’ दाखवून त्यांना सत्ताधारी पक्षात ‘विकत’ घ्यायचं.*
*ही ‘लोकप्रतिनिधी फोडण्याची’ फॅक्टरीच सुरू केलीये.*
*ED ची फाईल बंद करायची असेल तर आता फक्त ‘कमळ’ नाही, तर ‘आपल्या सोबत असलेल्या कोणत्याही पक्षात’ घ्यावंच लागेल – हा अलिखित नियमच झालाय.*
*’वॉशिंग मशीन’ ची फ्रँचायझी सगळ्या मित्रपक्षांना वाटून टाकलीये.*
*अर्थसंकल्पात निधी ‘आमदार-खासदारासाठी’ नसतो, तर ‘जनतेसाठी’ असतो.* पण जेव्हा ‘तांत्रिक कारण’ सांगून विरोधी पक्षाच्या आमदार-खासदाराची कामे रोखली जातात, तेव्हा ती जनतेची हार असते.
*’आपला पक्ष आणि आपले सहकारी पक्ष’ इतकंच वर्तुळ मर्यादित करून इतरांच्या हक्काचे निधी स्वतःकडे वळवून घेणं – हा ‘डाका’ आहे.* हा ‘विकासाचा डाका’ आहे.
*आणि या ‘डाक्या’ला पूरक म्हणूनच ‘पक्ष वाढीसाठी अनेक ऑपरेशन’ केली जातात.*
*प्रादेशिक अस्मितेचा आवाज उठवणारे पक्ष ‘फोडावे’ लागतात. आमदार-खासदार ‘विकत’ घ्यावे लागतात.*
*लक्षात ठेवा – हा त्या पक्षांचा ‘विकास’ नाही. ही ‘भयंकर मानसिक आजार’ आहे.*
*ज्या पक्षाला स्वतःच्या विचारांवर, कामावर विश्वास नसतो, त्यालाच ‘ऑपरेशन’ करून दुसऱ्यांचे आमदार पळवावे लागतात. त्यासाठीच ED-CBI सारखी सरकारी यंत्रणा ‘वॉशिंग मशीन’ सारखी वापरली जाते.*
*हा ‘आत्मविश्वासाचा अभाव’ आणि ‘सत्तेची भूक’ यातून आलेला ‘राजकीय कॅन्सर’ आहे.*
*ही सरळ सरळ ‘सूचीबद्धी’ आहे. याचा अर्थ असा – विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींची एक यादी बनवायची आणि ‘तू आमचा नाहीस’ म्हणून त्यांच्या मतदारसंघाचा निधी, त्यांची कामं जाणूनबुजून रोखायची. ‘आर्थिक अस्पृश्यते’चा हा नवा प्रकार आहे. पण आता त्यात ‘तपास यंत्रणांच्या दहशतीची’ भर पडलीये.*
*पण जेव्हा विरोधकांना संपवण्यासाठी सत्ताधारी ‘साम, दाम, दंड, भेद’ या चौघांच्या जोडीला पाचवा ‘निधी भेद’ आणि सहावा ‘ED-CBI चा दबाव’ नावाचा भाऊ सामील करून घेतात, तेव्हा प्रश्न पडतो – याला ‘लोकनियुक्त सरकार’ म्हणायचं की ‘पक्षनियुक्त टोळी’?*
*खरं तर ही ‘नीती’ नाही – ही ‘मानसिक विकृती’ आहे. आणि या विकृतीचं मूळ एकच – ‘सत्तेचा माज’.*
*”मला मत दिलं नाही म्हणून तुझ्या गावाचं पाणी तोडणार” – हा सेवेचा आविर्भाव नाही, हा ‘माजाचा’ उद्रेक आहे.*
*लोकशाहीत विरोधक संपवायचा नसतो, ‘समजावून’ घ्यायचा असतो. जो संपवायला निघतो, तो लोकशाही संपवायला निघतो. आणि लोकशाही संपवणाऱ्या राजवटीला इतिहासात एकच नाव आहे – ‘हुकूमशाही’. आणि हुकूमशाहीला ‘तपास यंत्रणा’ नावाचं शस्त्र लागतंच.*
*विकासाला ओलीस ठेवून, ED-CBI चा धाक दाखवून, जेलची धमकी देऊन, पक्ष फोडून मतं मिळवणं म्हणजे विकास नाही, ती वेठबिगारी आहे. हा ‘डाका’ आणि हा ‘रोग’ जनता ओळखून आहे.*
*सत्तेत कोणताही पक्ष असो, त्याने हा विषय लक्षात ठेवायलाच हवा – लोकांचा पैसा, लोकांसाठीच.*
*महाराष्ट्र देणारा आहे. कर देताना तो ‘भारतीय’ आहे, तर निधी घेतानाही तो ‘भारतीयच’ राहिला पाहिजे. डाका टाकून, पक्ष फोडून, यंत्रणांचा गैरवापर करून सत्तेचा माज करणारे लक्षात ठेवोत – जनता सगळं बघतेय. आणि जनता जेव्हा ‘रोगट’ मनाचा ‘माज’ उतरवायला उठते, तेव्हा २०२९फार दूर नसतं.*
*- शीतल हरीश करदेकर*
—




















